मर्यादापेक्षा जास्त आवाज शरीरासाठी घातकच–धार्मिक संस्थांनी आवाजाच्या मर्यादेेचे पालन केलेच पाहिजे -‘लाऊडस्पीकरबाबत तक्रार करणाऱ्याचे नाव उघड करू नका’
मुंबई-लाऊडस्पीकरचा उपयोग करणे कोणत्याच धर्मासाठी आवश्यक बाब नाही, असे परखड मत व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी ध्वनी प्रदूषण करणाऱ्या लाऊडस्पीकरविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.न्यायमूर्ती ए.एस. गडकरी व एस.सी. चंदक यांच्या खंडपीठाने म्हटले की, मर्यादापेक्षा जास्त आवाज शरीरासाठी घातकच आहे. एखाद्याला लाऊडस्पीकरचा वापर करण्याची परवानी मिळाली नाही तर तो अधिकाराचे उल्लंघन झाल्याचा दावा करू शकत नाही, असे सांगतानाच न्यायालयाने धार्मिक संस्थांना आवाजाच्या मर्यादेेचे पालन करण्याच्या सूचना द्या, असे निर्देश सरकारला दिले आहेत.
मुंबई हे बहुसांस्कृतिक शहर आहे. येथे विविध धर्मांचे लोक राहतात. त्यामुळे एखाद्या धर्माला किंवा संस्थेला लाऊडस्पीकर वापराच्या अशा परवानग्या देणे सार्वजनिक हिताचे नाही, असे न्यायालयाने सांगितले. ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी करणे हे सरकार आणि इतर प्राधिकरणांचे कर्तव्य आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
कुर्ला येथील दोन गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या भागातील मशिदीवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदूषण होत असल्याची तक्रार केली होती. याबाबत वारंवार तक्रार करूनही पोलिस कारवाई करत नसल्याचे सांगत त्यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. त्यावर ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लाऊडस्पीकरबाबत तक्रारी आल्यास पोलिसांनी तातडीने कारवाई करावी. तसेच तक्रारदारांची ओळख उघड न करण्याची खबरदारीही घ्यावी, असे न्यायालयाने बजावले आहे. धार्मिक स्थळांवर वापरल्या जाणाऱ्या लाऊडस्पीकरांमध्ये ध्वनी पातळी नियंत्रित करण्यासाठी यंत्रणा असावी, असे निर्देश न्यायालयाकडून राज्य सरकारला देण्यात आले आहेत.