मुंबई-ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उद्या या पक्षप्रवेशाचा पहिला टप्पा असल्याचे देखील उदय सामंत यांनी सांगितले. तसेच माझी बदनामी करणाऱ्यांनी या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश रोखून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उद्यापासून ठाकरे गटाला खिंडार पडण्यास सुरुवात होईल. याचा पहिला ट्रेलर उद्या तुम्हाला पाहायला मिळेल. ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार आणि 10 माजी आमदार तसेच काँग्रेसचे 5 आमदार व असंख्य जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये सामील होतील, असा दावा उदय सामंत यांनी केला. याचा पहिला टप्पा म्हणून उद्या रत्नागिरीत पहिला पक्ष प्रवेश होणार असून रत्नागिरीतील काही माजी आमदार हे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रत्नागिरीनंतर कोल्हापूरमार्गे सांगलीत जाणार आहे. सांगलीतून सातारा आणि साताऱ्यातून पुण्यात, असा पहिला टप्पा आहे. माझ्या नावाची बदनामी करणाऱ्यांनी आमच्या पक्षात येणाऱ्यांचे पक्ष प्रवेश रोखून दाखवावे, असे आव्हानही उदय सामंत यांनी विरोधकांना केले आहे. पुढील तीन महिन्यांत हे सगळे आमच्या पक्षात येतील. दररोज एक ब्रेकिंग न्यूज मिळेल, हा शब्द आहे, असेही ते म्हणाले.
उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटातील 20 आमदार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात होता. यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. काही नेते बालिश झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता न बोलले बरे, मी त्यांच्याबाबत नंतर सविस्तर बोलणार आहे. ज्यांचा राजकीय अस्त झाला आहे, त्यांचा राजकीय उदय करण्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करत आहेत. हा माझा मोठेपणा आहे. असल्या बालीशपणाने माझ्यात आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दरी निर्माण होणार नाही, असे म्हणत उदय सामंत यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.