स्वानंद प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित स्वानंद व्याख्यानमालेतील दुसरे सत्र
पुणे : परराष्ट्र धोरण हा पहिल्यापासून आपल्याकडे दुलर्क्षित राहिलेला विषय आहे. पं. नेहरू यांचा याविषयी अभ्यास होता. परंतु त्यावेळी हे ठराविक लोकांपुरते मर्यादित राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी २० संमेलन घेऊन हे धोरण घराघरात पोहोचविले. मोदींनी जनतेचा सहभाग घेतला. त्यामुळे आजच्या परराष्ट्र धोरणातून विकसित भारताला बळ मिळेल, असा विश्वास राज्याचे उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर यांनी व्यक्त केला.
स्वानंद प्रतिष्ठानच्यावतीने स्वानंद व्याख्यानमालेचे आयोजन सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल येथील संस्कार गुरुकुल येथे करण्यात आले. त्यातील दुसऱ्या सत्रात ते बोलत होते. यावेळी आमदार भीमराव तापकीर, काका चव्हाण, राजेंद्र मोरे, जगन्नाथ हेंद्रे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश असलेकर आदी उपस्थित होते.
शैलेंद्र देवळणकर म्हणाले, भारताचे परराष्ट्र धोरण हे चीन आणि पाकिस्तान पुरते मर्यादित होते. मात्र, आज नरेंद्र मोदी यांनी ९२ देशांचे दौरे केले आहेत. आपण अमेरिका आणि युरोप सारख्या देशांसमोर डोळ्यात डोळे घालून निर्णय सांगत आहोत, हा मोठा बदल झाला आहे. पायाभूत सुविधा, परकीय गुंतवणूक आणि कौशल्य विकास या तीन स्तंभांवर देशाची प्रगती होईल.
ते पुढे म्हणाले, उद्योगात रोजगार क्षमता आहे. त्यामुळे मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत हे नरेंद्र मोदी यांनी आणले. आज २३ टक्के रोजगार उपलब्ध असून उद्योगवृद्धीमुळे ६३ टक्के रोजगार उपलब्ध होऊ शकेल. शिक्षण पद्धतीत बदल आणि परराष्ट्र व्यवहार याबाबत आपण अधिक सजग व्हायला हवे. भारतीयांमध्ये सकारात्मकता असेल, तर भारत विकसित राष्ट्र होईल, असेही त्यांनी सांगितले. भीमराव तापकीर याने मनोगत व्यक्त केले. प्रकाश असलेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत पितालीया यांनी सूत्रसंचालन केले.

