मुंबई: वंचित आणि गरजू लोकांना विश्वास वाटेल असे वातावरण निर्माण करून त्यांना पुढाकार घेण्यास सक्षम बनवण्यासाठी समर्पित कार्याचा पाच वर्षांचा टप्पा गाठत सचिन तेंडुलकर फाउंडेशनने (STF) 22 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील द बॉम्बे क्लब येथे एक स्नेहसोहळा आयोजित केला. मित्र, कुटुंबीय, शुभचिंतक आणि ना-नफा तत्वावर काम करणाऱ्या सहयोगींकडून मिळालेल्या कौतुक आणि प्रोत्साहनाने सजलेल्या या कार्यक्रमात STF ने मुलांसाठी आरोग्य, शिक्षण आणि क्रीडा यांसारख्या मुख्य क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी चांगले जीवनमान सुनिश्चित करण्याच्या आपल्या बांधिलकीची पुन्हा पुष्टी केली.
या कार्यक्रमाची संकल्पना होती “शाइन ब्राइटर टुगेदर.” खेळ, आरोग्य आणि शिक्षणाच्या माध्यमातून प्रामुख्याने मुलांचे जीवन समृद्ध करण्याच्या फाउंडेशनच्या मुख्य कल्पनेवर यातून प्रकाश टाकण्यात आला.
सारा तेंडुलकर यांनी अलीकडेच फाउंडेशनच्या संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली असून त्यांचा हा पहिलाच अधिकृत कार्यक्रम होता. आपल्या आई-वडिलांनी दाखवलेल्या मार्गावर इतक्या लहान वयात पाऊल ठेवून सारा तरुणाईशी जोडणारी नवी दृष्टी घेऊन येत असून त्यांना त्यांची स्वप्नं, आकांक्षा पूर्ण करून भरारी घेण्यासाठी मदत करत आहे.
लोकांचे जीवन अधिक सुकर करणे आणि फाउंडेशनच्या उपक्रमांद्वारे त्यांच्या आयुष्यात परिवर्तनीय सकारात्मक प्रभाव पाडणे याबाबत बोलताना सारा तेंडुलकर म्हणाल्या, “लहानपणापासून नेहमीच मला माझ्या कुटुंबापासून प्रेरणा मिळत आली आहे. त्यांनी कायम मला देण्याच्या, दातृत्वाच्या सामर्थ्याचे महत्त्व समजावून दिले आहे. मला फाउंडेशनच्या कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळाली आणि केवळ मुलांच्याच नव्हे तर संपूर्ण कुटुंबांच्या जीवनात आशेची ज्योत कशी प्रज्वलित होते हे पाहायला मिळाले. गेल्या पाच वर्षांत सचिन तेंडुलकर फाउंडेशनने एक लाखाहून अधिक मुलांचे जीवन बदलले आहे. पुढे वाटचाल करण्यासाठी आम्हाला अशी लाखो कारणे मिळाली आहेत. आमच्यावर विश्वास दाखवणाऱ्या आणि हा प्रवास शक्य करण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहणाऱ्या प्रत्येकाची मी अत्यंत ऋणी आहे.”
“संचालक म्हणून, मी माझ्या पालकांनी सुरू केलेल्या कार्यावर पुढे काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. प्रत्येक छोट्या स्वप्नाला ओळख मिळावी आणि ते स्वप्न पूर्ण व्हावे याची मी काळजी घेईन. उद्याचे उज्ज्वल भविष्य असलेल्या मुलांसाठी शक्यतांचे नवे जग, नवी आशा निर्माण करणाऱ्या वाटेवर मार्गक्रमण करण्यास मी उत्सुक आहे.”
कार्यक्रमात दाखवलेल्या लघुपटाने उपस्थितांना फाउंडेशनच्या कार्याची झलक दाखवली. स्वप्नं पाहणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी सक्षम बनविण्यात धोरणात्मक भागीदारीद्वारे तेंडुलकर कुटुंब आणि सचिन तेंडुलकर फाउंडेशन (STF) यांची समर्पित वृत्ती किती मोलाची ठरली हे यातून उपस्थितांना जाणवले. STF सोबत काम करणाऱ्या 15 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या कार्याची प्रशंसा आणि गौरवही यावेळी करण्यात आला.
कोल्डप्लेचे क्रिस मार्टिनही यावेळी उपस्थित होते आणि त्यांनी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत व्यासपीठावर संवाद साधला. फाउंडेशनच्या प्रवासाबाबत बोलताना सचिन तेंडुलकर म्हणाले, “मी जेव्हा शेवटच्या वेळेस पॅव्हेलियनमध्ये परतलो, तेव्हा माझ्या मनात एक भावना होती की माझी इनिंग संपलेली नाही. अंजली आणि मी असे काही करण्याचे स्वप्न पाहिले जे वंचितांसाठी जीवन सुसह्य करेल आणि स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना स्वत:वर विश्वास ठेवण्यास आणि उंच भरारी घेण्यास मदत करेल. या कल्पनेची सुरुवात करणे सोपे होते, पण त्याची अंमलबजावणी कठीण होती. अखेरीस STF अस्तित्वात आले आणि आता आम्ही पाच वर्षांचा टप्पा पार केला आहे. प्रवास जोरात सुरू आहे आणि आता सारा नेतृत्व करत असल्याने, STF लाखो स्वप्नांना वास्तवात बदलण्यासाठी आणि नवी भरारी घेण्यासाठी पुढे जाईल याचा मला विश्वास आहे.”
लोकांशी सहजपणे जोडून घेणे आणि त्यांच्या क्षमतांचा विस्तार करून त्यांच्या आकांक्षापूर्ती साठी त्यांना मदत करणे या साध्या सरळ दृष्टिकोनातून सुरू झालेल्या STF च्या प्रवासाला आता क्रीडा-विकास उपक्रमांचे क्षेत्र विस्तृत करण्यासाठी नवीन उभारी मिळाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो मुलांना आणि तरुणांना त्याचा लाभ होईल. ग्रामीण भागात प्रगत पायाभूत सुविधा निर्माण करणे, स्थानिक रुग्णालये आणि प्राधिकरणांसोबत सहयोग करून मुलांसाठी आरोग्य सेवा अधिक मजबूत करणे आणि कौशल्य विकासासाठी संधी उपलब्ध करून देणारे नाविन्यपूर्ण शैक्षणिक कार्यक्रम सादर करणे या उद्दिष्टांवर आगामी काळात काम केले जाईल. मूलभूत दृष्टिकोनाला नव्या उत्साहासह जोडून STF च्या पुढच्या दशकाचे उद्दिष्ट ‘अब्जावधी स्वप्नं पूर्ण करण्याचे’ आहे.