पुणे- पुण्यातील कोर्टात काम करणाऱ्या एका पतीने पत्नीची शिलाई मशिनच्या कात्रीने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील खराडी परिसरात ही घटना घडली. ज्योती शिवदास गिते असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. बुधवारी (22 जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी शिवदास गिते हा मुळचा बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो पुण्याच्या खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होता. तो पुणे जिल्हा सत्र न्यायालयात टंकलेखक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला नोकरीवरून काढून टाकलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे. दारूच्या व्यसनामुळे आरोपी शिवदास गिते सतत पत्नीसोबत वाद घातल होता.पहाटे पत्नीने उठवल्याचा रागातून आरोपीने ही हत्या केल्याची माहिती आहे. मुलाला खूर्चीवर बसवून पतीने पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर त्याने आपण ही हत्या सेल्फ डिफेन्समध्ये केल्याचं म्हटलं. त्याचा व्हिडीओ काढून त्याने व्हॉट्स अॅप ग्रुपवर शेअर देखील केला होता. घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने ज्योती यांना ससून रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात जाता डॉक्टरांनी ज्योती यांना मृत घोषित केलं.
दरम्यान, आरोपी शिवदास गिते हा सस्पेंड होता, त्यामुळे त्याची पत्नी त्याला सकाळी चार वाजता अभ्यासाला उठवायची. परंतू पत्नीने उठवल्याचा राग आल्याने त्याने हे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस या प्रकरणात अधिकची माहिती घेत आहेत.