साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेस मधील संपूर्ण शहरातील अनधिकृत बांधकामे काढण्याची मागणी
पुणे- भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता ,संदीप खर्डेकर यांनी कर्वेनगर मधील बेकायदा बांधकामावर धडक कारवाईबाबत महापालिकेचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त या दोहोंच्या नावे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि,’
आज सकाळी कर्वेनगर मधील पाणंद रस्त्यावरील धडक कारवाई बघून सुखद धक्का बसला.जगप्रसिद्ध कर्वे स्त्री शिक्षण संस्था,
सिद्धिविनायक महाविद्यालय, कमीन्स इंजिनियरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज,यांच्या समोरील ह्या रस्त्यावर bottle neck झाले होते.ह्या रस्त्यावर मोठ्या वाहनांची, पी एमपी एल बसची वाहतूक सुरु असते,अरुंद रस्त्यावरील अतिक्रमाणामुळे तेथे पादचारी, वाहनचालक विद्यार्थीनी, सामान्य नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात.
अनेक वर्ष माझ्यासह ह्या भागातील नागरिक रस्ता रुंदीकरण करावे अशी मागणी करत होते,अखेर आज त्याचा मुहूर्त लागला .
स्थानिक लोकप्रतिनिधी, पथ विभाग प्रमुख, अतिक्रमण विभाग प्रमुख व टीम मनपा चे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
ह्या अनुषंगाने आणखी काही मागण्या खर्डेकर यांनी केल्या आहेत.
त्या पुढीलप्रमाणे ..
1) शहरात सर्वत्र साईड मार्जिन, फ्रंट मार्जिन, पार्किंग स्पेस अश्या ठिकाणी सर्रास अनधिकृत व्यवसाय सुरु असून त्यामुळे वाहने रस्त्यावर पार्क होतात व त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. तरी वरील विभागांप्रमाणेच बांधकाम विभागाला देखील सक्रिय करून त्यांच्या कडून देखील कडक व सातत्यापूर्ण कारवाई ची पुणेकरांची अपेक्षा आहे.
2) अश्याच पद्धतीने ( कर्वेनगर ) पुण्यनगरीत सार्वत्रिक कारवाई केल्यास प्रशासनास पुणेकर दुवा देतील आणि निश्चितच शनिवारवाड्यावर आपला जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित केला जाईल.
3) पथारी व्यवसायिकांचा व्यवसायिक हक्क अबाधित राखण्यासाठी आणि त्यांना वैधरित्या व्यवसाय करता यावा यासाठी अनेक वर्ष प्रलंबित असलेला हॉकर्स झोन चा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी करत आहे.