मुंबई-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये बराच गोंधळ उडाला आहे. अर्ज छानणीमध्ये अपात्र ठरणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबात मोठे भाकीत केले आहे. महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र बहिणींची यादी वाढवून त्यांच्याकडून पैसे परत घेतील आणि ही योजना बंद करतील, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
विधानसभा सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. ही योजना निवडणुकीपुरती आहे, नंतर बंद होईल, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, ही योजना चालूच राहिली, असे सत्ताधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. योजनेसंदर्भात अलिकडे अनेक संभ्रम निर्माण झाले आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना उपरोक्त दावा केला. तसेच एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला आहे.
महापालिका निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेतील अपात्र बहिणींची संख्या भाजप वाढवेल आणि कालांतराने योजना बंद होईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लाडकी बहीण योजनेवर माझे आकलन आहे त्यानुसार, ज्यांना अपात्र ठरवायचे आहेत किंवा ज्यांचे पैसे कमी करायचे आहेत किंवा ज्यांच्या खात्यातून परत पैसे काढून घ्यायचे आहेत, अशांची यादी मुंबई महापालिका निवडणुकीनंतर वाढेल. हे भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल. त्यांच्या खात्यातून पैसे परत घेतील आणि नंतर ही योजना बंद करून टाकतील, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
शिवसेना ठाकरे पक्षाचे 4 आमदार, 3 खासदार आणि काँग्रेसचे 5 आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले आहेत. कोणत्याही क्षणी महायुतीत येऊ शकतात, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. या दाव्यावरही आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्हाला जेवढे आमदार घ्यायचे तेवढे घ्या, पण जनतेची सेवा करा. ईव्हीएम ने तुम्हाला संख्याबळ दिले तर काम करा. भाजप आणि महाराष्ट्रात आणलेले राजकारण हे विषाचे फोडाफोडीचे आहे. उदय सामंत शिंदे गटाचे आमदार सुद्धा फोडायच्या विचारात आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंनी उदय सामंत यांना लगावला.
आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या शिवोत्सव मेळावा आणि पालकमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंना टोला लगावला. शिंदे गटाचे मेळाव्यात संगीताचा कार्यक्रम ठेवला आहे, असे कळले. मात्र त्यांच्या मेळाव्यात गायक आहेत आणि आमच्या मेळाव्यात नायक असल्याचे ते म्हणाले. त्यांना पालकमंत्री नाही, तर त्या जिल्ह्याचे मालक मंत्री व्हायचे आहे. दादागिरीसमोर मुख्यमंत्री झुकत आहेत, असेही ते म्हणाले.