- केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आयोजन
पुणे : सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोर-गरिबांच्या पैशांची बचत होते. लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्या सारख्या प्रथा बंद होतात. अनिष्ट प्रथा-परंपरांना त्यामुळे फाटा दिला जातो, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट’चे आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष आणि केमिस्टरत्न जगन्नाथ शिंदे उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट’तर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला.
यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, आमदार चेतन तुपे, पृथ्वीराज देशमुख, दत्तात्रय धनकवडे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे सचिव अनिल बेलकर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे अध्यक्ष संदीप पारख, खजिनदार रोहित करपे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय शाह, संजय खोपडे आदीनी कार्यक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला. शिंदे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील ५४ जोडप्यांची लग्नगाठ बांधण्यात आली. पुणे, नाशिक, संभाजीनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील गरजू – गरीब जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला.
अजित पवार म्हणाले, घरातील लग्नकार्यामुळे आई-वडील कर्जबाजारी झाल्याचे चित्र अनेक घरांमध्ये बघायला मिळते. त्यामुळे अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे. हे मानव सेवेचे काम आहे. अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ५४ जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे. केवळ स्वतःच्या आनंदासाठीच नाही तर त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना आधार आणि आनंद मिळाला आहे.
ते पुढे म्हणाले, अप्पासाहेब शिंदे हे उत्तम संघटन असणारे नेते आहेत. देशभरातील लाखो फार्मासिस्ट संघटना त्यांच्याशी जोडले गेले आहेत. तब्बल ४० वर्षे त्यांनी संघटनेसाठी दिली आणि अत्यंत किचकट तांत्रिक प्रश्न मार्गी लावले. देशात देखील चांगला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोलाचे काम केले आहे. दूरदृष्टी आणि सामाजिक भान जपणारे ते नेते आहेत
चंद्रकांत पाटील म्हणाले, एकाच क्षेत्रात सातत्याने काम करुन अप्पासाहेब शिंदे यांनी यश मिळवले आहे. याच पैशांनी ते समाजासाठी देखील काम करतात आणि अनेकांना मार्गदर्शन देखील करतात. पैसे कमवून आयुष्याच्या शेवटी ते सोबत नेता येत नाहीत, जसे आलो तसेच आपण रिकामेच जात असतो. त्यामुळे आयुष्यात समोर दिसेल ते काम करा आणि अप्पासाहेब शिंदे यांच्यासारखे फक्त पैसे नाही तर माणसे जोडा, असेही त्यांनी सांगितले.
जगन्नाथ शिंदे म्हणाले, माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या वर्गणीवर हा सामूहिक विवाह सोहळा करण्यात आला आहे. आपण काम करताना माणसाला देव मानून समाजाला काही तरी देत जावे आणि त्यांची सेवा करावी, हीच यामागे भावना आहे. गरीब आणि आदिवासी समाजातील अनेक जोडपी येथे विवाहबद्ध झाली. त्यामुळे त्यांचा लग्नसोहळा आमच्या माध्यमातून होतो आहे, ही समाधानाची बाब आहे.