पुणे, दि. २२: वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता पुणे शहरातील विविध वाहतूक विभागांतर्गत रस्त्यावरील पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार कोथरुड वाहतूक विभागांतर्गत मीनाताई ठाकरे कमान लेनच्या सुरुवातीपासून ते संकल्प व सिद्धी को. ऑप. हौसींग सोसायटीदरम्यानच्या रस्त्यावर १०० मीटर दोन्ही बाजूस ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे. माई मंगेशकर मार्गावर मीनल गार्डन सोसायटी मुख्यद्वार ते श्रीकृष्ण सोसायटीदरम्यान दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे.
बाणेर वाहतूक विभागांतर्गत पॅनकार्ड लेन बालेवाडी कॅनल रस्ता ते हॉटेल स्प्रिंग ओनियन दरम्यान दोन्ही बाजूस पी-१, पी-२ पार्किंग करणेत येत आहे. डेक्कन वाहतूक विभागांतर्गत कर्वे रस्त्यावरील सह्याद्री रुग्णालयाच्या बाहेर पडण्याच्या द्वारापासून ते विमलाबाई गरवारे शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत १०० मीटर पर्यंत नो-पार्कीग झोन करण्यात येत आहे.
भारती विद्यपीठ वाहतूक विभागांतर्गत कदम प्लाझापासून लेक टाऊनकडे (बिबवेवाडी) जाणाऱ्या सेवा रस्त्यावर रामनाथ स्वीट्स समोरील भिंतीपासून ते ग्रीन पार्क बिल्डिंग (पिझ्झा हट समोरील) भिंतीपर्यंत (१७६ मीटर) दोन्ही बाजुस सर्व प्रकारच्या वाहनांना ‘नो पार्कीग झोन’ करण्यात येत आहे.
पार्किंग व्यवस्था बदलाबाबतच्या या तात्पुरत्या आदेशाबाबत नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, एअरपोर्ट रोड, पुणे यांच्या कार्यालयात ५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे पोलीस उपआयुक्त अमोल झेंडे यांनी कळविले आहे.