पुणे : मन, मेंदू आणि मनगट बळकट करायचे असेल तर निर्व्यसनी असणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण शरीरात व्यसनाने प्रवेश केला की शरीर नामक यंत्र गंजू लागते. स्वामी विवेकानंद म्हणायचे निर्व्यसनी देहाचे तरुण मला द्या मी देश बदलून दाखवेन. त्यामुळे समाज बळकट होण्यासाठी व्यसनाधीनता कमी झाली पाहिजे, असे मत प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. रोहिणी माने परांजपे यांनी व्यक्त केले.
श्री संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ व ॲम्युनिशन फॅक्टरी तसेचसंलग्न संस्थेच्या वतीने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी येथे हा महोत्सव सुरु आहे. महोत्सवात महिलांच्या सामुदायिक हरिपाठचा विशेष कार्यक्रम तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा देखील घेण्यात आल्या. यावेळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज सदानंद मोरे, ह.भ.प पार्वती चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भोला शेठ वांजळे, गणेश चव्हाण, जेजुरी संस्थानचे विश्वस्त डॉ.राजेंद्र खेडेकर, ॲम्युनिशन फॅक्टरी च्या जनरल मॅनेजर हजारे मॅडम, पेशवाई श्रीमंत च्या संचालिका अश्विनी येमुल, राहुल येमुल, प्रिय येमुल, अमोल येमुल आदी उपस्थित होते.
किर्तन महोत्सवाचे अध्यक्ष ह.भ.प ज्ञानेश्वर पंढरीनाथ वांजळे, ह.भ.प प्रमोद महाराज रनवरे यांनी तर महिला कार्यक्रमाचे आयोजन गंगा वांजळे, मनीषा वांजळे यांनी केले. ह.भ.प. डॉ. पुनम महाराज जाचक यांचे प्रवचन देखील झाले.
रोहिनी माने- परांजपे म्हणाल्या, भक्तीच्या प्रांतामध्ये केवळ देव भक्ती हाच विचार नसून देवाचे कार्य म्हणजे देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्माभिमान या सर्व गोष्टींचा अंश आपल्या जीवनात असावा. त्यासाठी संत पठण, महापुरूषांच्या जीवनाचा अभ्यास करावा.
त्या पुढे म्हणाल्या, देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचे मी काहीतरी देणे लागतो. ते समाजऋण, देशऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. मानवी जन्म मिळणे हे भाग्याचे लक्षण आहे परंतु मानवीजन्म घेवून त्या देहाचे सार्थक करणे हे भाग्याचे लक्षण आहे. तोच खरा देवभक्त, राष्ट्रभक्त संतांचा प्रिय भक्त ठरतो, असेही त्यांनी सांगितले. ह भ प जंगले महाराज यांनी सूत्रसंचालन केले.