डोनाल्ड ट्रम्प यांनी आज दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.सोमवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता आणि भारतीय वेळेनुसार आज रात्री 10.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत ट्रम्प पर्व सुरु झाले आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान, पत्नी मेलानिया बायबल धरून उभ्या होत्या. ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर, कॅपिटल बिल्डिंगच्या रोटुंडामध्ये काही काळ टाळ्यांचा कडकडाट झाला. यापूर्वी, त्यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचे 45 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या आधी रिपब्लिकन नेते जेडी व्हॅन्स यांनी अमेरिकेचे 50 वे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं दिली. डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी युनायटेड स्टेट्स कॅपिटल रोटुंडा येथे पार पडला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक उद्योगपती आणि मोठे नेते उपस्थित होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेण्यापूर्वी जेडी वन्स यांनी उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली. यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेण्यासाठी मंचावर उभे राहिले. डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली.डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला 700 पाहुणे उपस्थित होते. भारतातून उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हजेरी लावली. याशिवाय इलॉन मस्क, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग आणि टिम कुक, सॅम ऑल्टमन आणि टिकटॉकचे प्रमुख शौ जी च्यु हे देखील यावेळी सहभागी झाले होते.