पुणे : सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या पीएम सूर्यघर वीज योजनेचा जागर करण्यासाठी सौर रथाचे रविवारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. महावितरणच्या या उपक्रमाचे मोहोळ यांनी कौतुक केले. घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्यवत करणाऱ्या या योजनेत जास्तीत जास्त वीजग्राहकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
पांडवनगर येथे आयोजित सौर रथाच्या कार्यक्रमाला आमदार सिद्धार्थ शिरोळे, महावितरणचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, मास्माचे अध्यक्ष शशिकांत वाकडे, खजीनदार समीर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आहे. घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (मास्मा) यांच्या सहकार्याने पाच दिवसीय सौर रथाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विविध ठिकाणी येत्या गुरुवार पर्यंत हा सौर रथ फिरणार आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सौर रथाद्वारे डिजिटल स्क्रिनद्वारे वीजग्राहकांशी थेट संवाद व योजनेची माहिती, फायदे, प्रतिकिलो वॅट मिळणारे अनुदान, ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रात्यक्षिक तसेच माहिती पत्रकांच्या माध्यमातून योजनेचा जागर करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याहस्ते प्रधानमंत्री सूर्यघर योजनेचे लाभार्थी सतीश आठवले, आनंद देशपांडे, शुभांगी बाळासाहेब देशमुख, ऋषिकेश सोसायटी, तुषार गायकवाड, हेमंत लोहकरे, सुभाष लाड या वीजग्राहकांना अनुदान मंजुरीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यकारी अभियंता विजय फुंदे यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता शेखर मुरकुटे, सोमनाथ मुंडे, अतुल देवकर, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त) राहुल पवार आदींसह महावितरणचे अधिकारी व मास्माचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

