पुणे: महापालिका अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागामार्फत 200 हुन अधिक ठिकाणी कारवाई करण्यात आली.पुणे मेट्रो, जिल्हा न्यायालय या जागेतील अनधिकृत अतिक्रमण काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर सिव्हिल कोर्ट येथील मेट्रो स्टेशनच्या डेंगळे पुलालगतच्या जागेत मागील काही महिन्यात अंदाजे ५० अनधिकृत झोपड्या अतिक्रमण करून बांधण्यात आल्या होत्या. या झोपड्यांवर कारवाई करून अतिक्रमण हटविण्यात आले. ही कारवाई परिमंडळ दोनचे उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त गोविंद दांगट यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, चार पोलीस निरीक्षक, १५ पीएसआय, ७८ अंमलदार पोलीस, ५० सुरक्षा अधिकारी आणि इतर यांनी ही कारवाई केली.
पुणे महापालिका आणि पुणे मेट्रो यांनी ही संयुक्त कारवाई केली. यात दोन जेसीबी, सहा टेम्पो, एका हायड्रा, ४० कर्मचारी यांचा समावेश होता. यावेळी मुख्य प्रकल्प व्यवस्थापक अमोलकुमार मोहोळकर यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. दोनशेहून अधिक अतिक्रमणांवर कारवाई
महापालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर नगर रस्ता परिसरातही अतिक्रमण कारवाई केली. परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी मिळून कारवाईचा धडाका लावला आहे. या सलग सुरू असलेल्या कारवाईत तीन दिवसात २०० हून अधिक अनाधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
नगर रस्ता परिसरातील मंत्री मार्केट, खराडी बायपास येथील १०२ अनाधिकृत हातगाड्या, स्टॉल, काउंटर, झोपड्या आदींवर कारवाई करण्यात आली. याच कारवाईअंतर्गत बुधवारी (दि. १५) दुपारपर्यंत खराडी आयटी पार्क परिसरातील गेरा बार्कलेजसमोरील ३० अनधिकृत व्यावसायिकांचे स्टॉल जेसीबी लावून तोडण्यात आले. या मोहिमेअंतर्गत ताडीवाला रस्ता ढोले, पाटील रस्ता, सौरभ हॉल परिसरातील ७२ अनधिकृत हातगाड्या, स्टॉल, काउंटर, झोपड्या, पथारी व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.
या कारवाईत कोंढवा, येवलेवाडी येथील फ्रंट मार्जिन तसेच रस्ता व पदपथावरील अतिक्रमणे काढण्यात आली. या कारवाईत ४० काउंटर, दोन हातगाड्या, सहा सिलिंडर तसेच आदी साहित्य जप्त करून अतिक्रमण गोडाऊन येथे जमा करण्यात आले. तसेच कारवाईमध्ये कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयातील घनकचरा व्यवस्थापन विभागातील सेवकांद्वारे अस्वच्छता, प्लास्टिक वापराबाबत एकूण २६ नागरिकांवर कारवाई करून २३,७०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोंढवा येवलेवाडी कार्यालयातील परवाना व आकाशचिन्ह विभागातील सेवकांद्वारे बोर्ड, बॅनर, फ्लेक्स, लॉलीपॉप, केऑक्स आदींवर कारवाई करून दोन हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
परिमंडळ क्रमांक चारच्या यांच्या नियंत्रणाखालील कोंढवा येवलेवाडी कार्यालयाअंतर्गत व्हीआयटी कॉलेज चौक ते कान्हा हॉटेल या परिसरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम निर्मूलन, प्लास्टिक प्रतिबंधात्मक, परिसर स्वच्छता कारवाई करण्यात आली. ही कारवाई अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी., उपायुक्त (परिमंडळ क्र.४) जयंत भोसेकर आणि सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आली