पुणे, दि.१८: राज्याचे शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी सर्व शिक्षण संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांना शनिवारचे औचित्य साधून “आनंददायी शनिवार ” या उपक्रमासह, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत शाळांना भेटी देण्याचे शुक्रवारी सायंकाळी निर्देश दिले होते.
शिक्षण आयुक्त श्री सचिद्र प्रताप सिंह यांनी स्वतः देखील आज शनिवारी दिनांक 18/01/2025 रोजी पानशेत व परिसरातील शाळांना अचानक भेटी दिल्या त्यांच्या समवेत प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था पुणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे व अन्य अधिकारी देखील उपस्थित होते. पानशेत समूह शाळा भेटीदरम्यान विद्यार्थी- शिक्षक यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थ्यांचे आनंददायी शनिवार अंतर्गत नाट्यीकरण, कविता, नृत्य, भाषा व गणित खेळ पाहिले. स्वतः शिक्षण आयुक्त तब्बल 40 मिनिटे विद्यार्थ्यांमध्ये उभे राहून विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून संवाद साधत होते. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना त्यांनी आयएस या परीक्षेत उत्तीर्ण कसे झाले याचा प्रेरणादायी प्रवास उलगडून सांगितला. शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
तसेच राज्यस्तरावरील सर्वच अधिकाऱ्यांनी देखील राज्यातील विविध भागातील आज अचानक शाळांना भेटी दिल्या. या अधिकाऱ्यांनी शाळांच्या भेटीदरम्यान शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार, शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शाळेत दिल्या जाणाऱ्या आहाराची स्थिती पाहिली. इयत्ता दहावी व बारावीचे वर्ग असणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यालयास सुट्टी असल्याने शनिवारी राज्यातील वरिष्ठ अधिकारी शाळांमध्ये भेटी देऊन विद्यार्थ्यांमध्ये रममान झाल्याचे चित्र दिसून आले.