पुणे:महापालिकेच्या नगरसचिवपदी राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांची अखेर पदोन्नतीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. एका बाजूला महापालिका अमृतमहोत्सव ( ७५ वर्षे) पूर्ण करत असतानाच पालिकेच्या इतिहासातील त्या पहिल्या महिला नगरसचिव बनल्या आहेत. सर्वात कमी सेवावधित झालेल्या त्या नगरसचिव मानल्या जाऊ शकतील आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांची नगरसचिव पदावर नियुक्ती केली आहे
३१ ऑगस्ट २०२० रोजी सुनील पारखी सेवानिवृत्त झाल्यानंतर नगरसचिव पदाचा अतिरिक्त कारभार कामगार कल्याण अधिकारी शिवाजी दौंडकर यांच्याकडे सोपविण्यात आला होता. १ सप्टेंबर २०२० ते ३१ मे २०२३ पर्यंत शिवाजी दौंडकर सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कारभार होता. शिवाजी दौंडकर सेवानिवृत्त झाल्यानंतर १ जून २०२३ पासून राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले यांच्याकडे नगरसचिव पदाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर आता आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगरसचिव पदावर नियुक्ती केली आहे.
माजी महापौरांनी केले निवडीचे स्वागत –
पुणे महापालिकेच्या नगरसचिव पदी योगिता भोसले यांची झालेली निवड ही अतिशय योग्य असल्याचे सांगत माजी महापौर संघटनेने भोसले यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. पहिल्या महिला नगरसचिव होण्याचा मान त्यांनी मिळवला आहे. नगरसचिव कार्यालयात गेली अनेक वर्ष त्या काम करीत आहे. कुठल्याही राजकारणाला बळी न पडता नियमाप्रमाणे काम करीत आहेत, हे आम्ही अनेक जणांनी पाहिले आहे. या पुढील काळात त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या कामाची अपेक्षा आहे. संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी भोसले, सचिव कमल व्यवहारे व निमंत्रक अंकुश काकडे यांनी एका पत्रकाद्वारे या निवडीचे स्वागत केले आहे.