अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही.
‘लाडकी बहीण’ योजनेच्या पारदर्शकतेची गरज आताच का भासली? मते घेताना भाजपा युती झोपली होती का?
दावोसला जाऊन गुंतवणुकीच्या नावाखाली जनतेच्या पैशाची उधळपट्टी करु नका.
मुंबई, दि. १८ जानेवारी २०२४
महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच सुरक्षित नाहीत अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत असल्याचा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नागपुरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भिती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता गुन्हेगारांची झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री दागी असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, पण ही परिस्थिती बदलावी लागणार आहे. अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जाती धर्माच्या दृष्टीकोणातून पाहू नका. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात जाती धर्माच्या भेदभावाला थारा नाही, या राज्यात सर्व जाती धर्माचे लोक सुरक्षित राहिले पाहिजेत.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे. मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला आहे, त्यातून जनतेचे मुळ प्रश्न बाजूलाच पडले आहेत. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागत आहे, महागाई गगनाला भिडली आहे, हे प्रश्न महत्वाचे आहेत. जाती धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे असेही नाना पटोले म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची मते हवी होती म्हणून सर्व बहिणींना योजनेचा लाभ दिला, याच बहिणींच्या मतांवर सत्तेत आले आणि आता भाजपा युती सरकारला लाडकी बहिण योजनेतील त्रुटी दिसत आहेत का? बहिणींची मते घेताना या त्रुटी व पारदर्शकता आठवली नाही का? सरकार आल्यानंतर पडताळणी करण्याची गरज का पडावी? बोगस लाभार्थी बहिणींकडून पैसे परत घेण्याची धमकी मंत्री देत आहेत, यातून भाजपा युतीचा खरा चेहरा उघडा पडला आहे. परंतु भाजपा युती सरकारने जाहिर केल्याप्रमाणे प्रत्येक लाडक्या बहिणीला सरसकट २१०० रुपये दिले पाहिजेत, असेही नाना पटोले म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनीही राज्यातील उद्योगपतींना दावोसला घेऊन दौरा केला होता, त्याची नक्कल देवेंद्र फडणवीस यांनी करू नये. महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात एक नंबरवर आहे हा दावा भाजपा सरकार करत आहे पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी आहे, महाराष्ट्राची घसरण झालेली आहे. गुंतवणुकीच्या नावाखाली दावोसला जाऊन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नका, असेही पटोले म्हणाले.