परिसंवाद, कथाकथन, कथावाचनासह शालेय विद्यार्थ्यांचे रंगणार कविसंमेलन
पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या आणि बालसाहित्यातील मातृ संस्था असलेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेतर्फे दि. 23 व दि. 24 जानेवारी रोजी मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे शिवांजली शैक्षणिक संकुल, चाळकवाडी-पिंपळवंडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बालसाहित्यिक ग. ह. पाटील यांच्या जन्मगावी हे संमेलन होत आहे.
मुलांना बालसाहित्याची ओळख व्हावी, त्यांची वाचनाची भूक वाढावी, त्यांच्या चौकस वृत्तीला विहारायला आणखी नवे आकाश लाभावे, नामवंत बालसाहित्यिकांना पाहता यावे, त्यांच्याशी संवाद साधता यावा या उद्देशाने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, विश्वस्त, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ यांची निवड करण्यात आली आहे. संमेलन नगरीस ग. ह. पाटील बालसाहित्य नगरी असे नाव देण्यात आले असून कै. सौ. मातोश्री अलकामाई भिमाजी सोनवणे सभामंडपात संमेलन होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन गुरुवार, दि. 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता आमदार शरद सोनवणे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, वसंतराव काकडे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे, संस्थाध्यक्ष राजेंद्र पायमोडे, संस्था सचिव गजानन चाळक, शाला समिती सदस्य तुळशीराम नरवडे, सुभाष विद्या मंडळाचे अध्यक्ष रमण काकडे, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, चाळकवाडीच्या सरपंच मेघा काकडे, संस्था कोषाध्यक्ष कोंडीभाऊ वामन, प्रा. शा. समिती अध्यक्ष प्रदीप वायकर, संमेलनाचे निमंत्रक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शरद लेंडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
शुक्रवार, दि. 24 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडीला सुरुवात होणार आहे. या प्रसंगी नारायणगाव ग्रामविकास संस्थचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य आशा बुचके उपस्थित असणार आहेत.
संमेलनाच्या ध्वजारोहणानंतर पहिल्या सत्रात सकाळी 10:30 वाजता ‘बालसाहित्याची सद्य:स्थिती’ या विषयावर परिसंवाद होणार असून यात श्रीकांत पाटील (कोल्हापूर), अनिल कुलकर्णी (पुणे), जालिंदर डोंगरे (जुन्नर) यांचा सहभाग असणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. कैलास दौंड (पाथर्डी) असतील. दुसऱ्या सत्रात सकाळी 11:30 वाजता ‘मनोरंजनातून बालसाहित्य’ अंतर्गत सूर्यकांत सराफ (छत्रपती संभाजीनगर) आणि एकनाथ आव्हाड (मुंबई) मुलांशी संवाद साधणार आहेत. तिसऱ्या सत्रात दुपारी 1:30 वाजता ज्येष्ठ बालसाहित्यिक भास्कर बडे (बिड) यांच्या अध्यक्षतेखाली ‘शालेय विद्यार्थी कविसंमेलन’ होणार असून यात बालसाहित्यिक अलका सपकाळ (धाराशिव) यांच्यासह विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
चौथ्या सत्रात दुपारी 2:30 वाजता ‘कथा पंचक’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांचे कथावाचन होणार असून बालसाहित्यिक डॉ. विनोद सिनकर (छत्रपती संभाजीनगर) अध्यक्षस्थानी असणार आहेत. दुपारी 3:30 वाजता आयोजित पाचव्या सत्रात संजय ऐलवाड (पुणे), बालकृष्ण बाचल (पुणे) आणि उत्तम सदाकाळ (जुन्नर) ‘कथाकथन’ सादर करणार असून रमेश तांबे (मुंबई) अध्यक्षस्थानी असणार आहेत. सायंकाळी 4:30 वाजता प्रसिद्ध बालसाहित्य समीक्षक डॉ. विद्या सुर्वे-बोरसे (नाशिक) यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, श्रीपाद अपराजित, समर्थ शैक्षणिक संकुलाचे प्रमुख वल्लभ शेळके, विशाल जुन्नर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे, जनमंगल परिवाराचे संस्थापक अनंत चौगुले, कुरण येथील जयहिंद शैक्षणिक संकुलाचे प्रमुख विजय गुंजाळ, गजानन महाराज शिक्षण संस्थेचे सचिव वैभव तांबे, जुन्नर येथील शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे सुनील ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
मुलांना साने गुरुजींच्या कथासंग्रहाची भेट
संमेलनात सहभागी होणाऱ्या मुलांना साने गुरुजी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त साने गुरुजी यांच्या कथांचा संग्रह भेट देण्यात येणार आहे.
अस्सल जुन्नरी मेजवानी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या साहित्यिक व साहित्यप्रेमींना जुन्नर येथील अस्सल पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. मासवडी, बाजरीची भाकरी, आमटी असा खास बेत असणार आहे.
चाळकवाडी येथे मराठी बालकुमार साहित्य संमेलन:ज्येष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ संमेलनाध्यक्ष
About the author
SHARAD LONKAR
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/