वाहनांसाठी सर्व पूल १५ जूनपर्यंत खुला होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे
पुणे, १८ जानेवारी
सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या दुहेरी उड्डाणपुलाचे काम वेगात सुरू असून, औंधकडून गणेशखिंडकडे जाणारा पूल वाहनांसाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात खुला होईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी शनिवारी सांगितले. गणेशखिंड रस्त्याने बाणेर आणि पाषाणकडे जाणारा पुल वाहनांसाठी १५ जूनपर्यंत सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर मेट्रोचा पूल आणि स्थानक बांधण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विद्यापीठ चौकातील पुलाच्या बांधकामामुळे वाहनचालकांना मोठ्या समस्येला तोंड लागत आहे. वाहतूक पोलिसांनी तेथे विविध उपाय योजत वाहतूक जास्तीत जास्त सुरळित ठेवण्याचा प्रयत्न केला. येथील पुलाचे बांधकाम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी शिरोळे गेली दोन वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत. शिरोळे यांनी अधिकाऱयांसमवेत आज विद्यापीठ चौकातील कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
शिरोळे म्हणाले, वाहनांची संख्या अधिक असल्याने, येथील काम करताना अनेक अडचणी येत होत्या. जागेचा ताबा मिळण्यात अडचण आली. काही ठिकाणी रस्ता रुंदीकरण करावे लागले. मेट्रोच्या पुलाचे आणि स्थानकाचे कामही सुरू आहे. वाहतूक पोलिसांनी येथे चांगले नियोजन केले. त्यामुळे सध्या वाहतुकीची गती थोडी कमी असली, तरी वाहतुकीची कोंडी होत नाही. येत्या पावसाळ्यापूर्वी वाहनांसाठी हा पूल खुला होईल, या दृष्टीने काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने आज सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱयांसह पाहणी केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. येत्या महिनाभरात त्या अडचणी दूर केल्या जातील.
गणेशखिंड रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. तेथील आणि औंध बाजूकडील पुलाचा रॅम्प एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बांधून पूर्ण होईल. त्यामुळे वाहनांना औंधकडून गणेशखिंड रस्त्याकडे पुलावरून जाता येईल. बाणेर रस्त्यावर रॅम्प बांधण्यासाठी जागेचा ताबा नुकताच मिळाला आहे. लवकरच रॅम्प बांधण्यास सुरवात होईल. पाच महिन्यांत ते काम पूर्ण होईल. बाणेर बाजूला वाहनांना दोन्ही बाजूंनी ये – जा करता येईल. मेट्रोही त्याच दिशेने जाणार आहे. पाषाण बाजूला पुलाच्या रॅम्प बांधण्यासाठी जागा मिळण्याबाबत थोड्या अडचणी आहेत. येत्या पंधरववड्यात महापालिकेशी व संबंधितांशी बोलून जागा ताब्यात घेतली जाईल. तेथील रॅम्पचे काम पूर्ण झाल्यानंतर, वाहनचालकांना गणेशखिंड रस्त्याने पाषाणकडे जाता येईल. जूनमध्ये हे दोन्ही रॅम्पचे बांधकाम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या पुलांवरून वाहनांची ये-जा सुरू झाल्यानंतर विद्यापीठ चौक आणि या परिसरातील वाहतुकीच्या कोंडीची समस्या सुटेल.
शिरोळे यांच्यासोबत पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, मेट्रोची उभारणी करणाऱया टाटा कंपनीचे अधिकारी, वाहतूक पोलिस विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नंदा वग्याणी, पोलिस निरीक्षक मीनल पाटील, सुनील गवळी, पीएमआय नरेंद्र मुंढे यावेळी उपस्थित होते.
…….