मुंबई :लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांना दिल्या जाणाऱ्या पैशामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. यातच लाडक्या बहिणी योजनेमुळेच राज्यातील मतदारांनी महायुतीला भरघोस मतदान केल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता निवडणुकीनंतर लाडकी बहिण योजनेचे निकष बदलले जाणार असल्याचा आरोप केला जातोय. मात्र, असे कोणतेच निकष बदलणार नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, निकषामध्ये बसत नसणाऱ्या महिला आता स्वतःहून पुढे येत आहेत. या योजनेतील सुमारे चार हजार महिलांनी योजनेतून नाव काढण्यासाठी अर्ज केले असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहिण योजनेमध्ये निकषात न बसणाऱ्या महिलांकडून पैसे परत घेण्याची कोणतीच योजना किंवा तसा कोणताच विचार नसल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले होते. मात्र निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्याआधीच राज्यभरातील सुमारे 4000 पेक्षा अधिक महिलांनी ‘योजना नको’ असा अर्ज दाखल केला आहे
राज्य सरकारच्या वतीने निवडणुकीच्या आधी घोषित करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर राज्यभरातून मोठ्या संख्येने महिलांनी यात अर्ज केले होते. मात्र निकषात बसत नसलेल्या अपात्र महिलांच्या वतीने देखील अर्ज करण्यात आले होते. राज्य सरकारने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची पडताळणी न करता सरसकट अर्ज भरणाऱ्या महिलांना लाभ दिले होते. मात्र आता पडताळणीनंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरतील, असा अंदाज वर्तवला जात होता. तत्पूर्वीच सुमारे 4000 महिलांनी योजनेतून आपली नावे मागे घेतली आहेत.काही महिलांनी लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या महिन्यातही काही अर्ज आले होते. या महिन्यातही हे अर्ज येत आहेत. आपण या योजनेसाठी पात्र नाही, असं लक्षात आल्यानंतर काही महिला अर्ज भरून योजनेचा लाभ नाकारत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रामाणिकसुद्धा आहेत, हे यातून सिद्ध होत असल्याचे आिदती तटकरे यांनी म्हटले आहे. आतापर्यंत चार हजार अर्ज आले आहेत, ही आकडेवारी अंदाजे आहे. डिसेंबरमध्ये देखील अर्ज आले होते. जानेवारीत जास्त प्राप्त व्हायला सुरुवात झाली आहे. या महिलांकडून परत आलेला निधी पुन्हा सरकारी तिजोरी देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वतंत्र रिफंड हेड तयार करून त्या निधीचा उपयोग लोककल्याणासाठी केला जाणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.
अर्ज देऊन योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग:राज्य सरकारच्या पडताळणीत अपात्र ठरण्याची शक्यता असणाऱ्या महिलांनी आतापर्यंत मिळालेले पैसे देखील आपल्याला परत करावे लागतील, या भीतीपोटी लेखी अर्ज देऊन योजनेतून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला आहे. पडताळणी मध्ये अपात्र ठरल्यास मिळालेल्या लाभाची रक्कम दंड सहित वसूल करण्यात येण्याची भीती या महिलांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींनी आता अर्ज माघारी घेण्यास सुरुवात केली आहे.
2 कोटी 34 लाख महिलांना दरमहा दीड हजार रुपये:राज्यघरातून 2 कोटी 63 लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. तर 2 कोटी 47 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना विधानसभा निवडणुकीच्या आधीच दरमहा दीड हजार रुपये राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत. तर आता राज्य सरकारच्या पडताळणी नंतर तीन ते चार लाख महिला या योजनेतून अपात्र ठरतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील शासकीय कार्यालयांमध्ये योजनेचा लाभ थांबवण्याची विनंती करणारे अर्ज दाखल होत आहेत.