समाजविघातक कृत्य, अतिक्रमणे
खपवून घेतली जाणार नाहीत:आमदार शिरोळे
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणे आणि समाजविघातक कृत्यांना उत्तेजन देणाऱ्या घडामोडी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा आमदार शिरोळे यांनी आज (शनिवारी) दिला आहे.
आमदार शिरोळे यांनी महापालिकेचे अतिक्रमण खाते, बांधकाम खाते आणि वाहतूक पोलीस अधिकारी यांच्या समवेत पहाणी दौरा केला. यावेळी शिरोळे यांनी व्यापाऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. व्यापारी वर्गाने सहकार्याची भूमिका घेतली. फर्ग्युसन रस्ता हा गजबजलेला, रहदारीचा रस्ता आहे. तेथील अतिक्रमणांबद्दल तक्रारी आहेत. त्या संदर्भात महापालिकेने अलीकडे कारवाईही केलेली आहे. येथे अतिक्रमणांना आता थारा दिला जाणार नाही. शिवाय येथे समाजविघातक हालचालींना उत्तेजन दिले जाते, अशाही तक्रारी आहेत. हे प्रकार रोखले जावेत तसेच अतिक्रमणांना थारा देऊ नये, प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अशा सूचना आमदार शिरोळे यांनी पहाणी दौऱ्यात दिल्या.याबाबत पाठपुरावा केला जाईल आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठकही घेतली जाईल, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.