मुंबई: सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात पोलिसांकडे बरेच धागेदोरे आहेत. त्याआधारावर पोलिस काम करत आहेत. या प्रकरणात पोलिस लवकरच कारवाई पूर्ण करतील, असे CM देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस दौऱ्यावर आहेत. या कालावधीत ते वर्ल्ड इनॉकॉनिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. दावोसमध्ये मला चांगल्या प्रकरच्या गुंतवणुकीच्या संधी दिसत आहेत. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते आज नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी बीड आणि सैफ अली खान प्रकरणावरही आपली प्रतिक्रिया दिली.
विचारांचे आदान-प्रदान आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे देखील नेटवर्किंग होते. त्या दृष्टीनेच मी दावोसला जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. ही केस घेण्यासंदर्भात उज्वल निकम यांच्याशी चर्चा केली असून ते याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
बीड प्रकरणातील दोषींना सोडणार नाही
बीड प्रकरणात होणारे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे. तपास यंत्रणा सगळ्या गोष्टी रोज बाहेर सांगू शकत नाहीत. अनेक गोष्टी गोपनीय ठेवूनच तपास केला जातो. त्यामुळे तपास यंत्रणांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता, त्यांना काम करू दिले पाहिजे. बीड प्रकरणातील कोणत्याही दोषी व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. तपास यंत्रणा योग्य प्रकारे काम करत आहेत.
…तर उज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध करतील
उज्वल निकम यांच्यासारख्या एका वकिलाची नियुक्ती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासंदर्भात उज्वल निकम यांना विनंती देखील केलेली आहे. ते सकारात्मक निर्णय घेतील, असा मला विश्वास आहे. परंतु, मला नेमल्यानंतर काही लोक राजकारण करतात, राजकीय रंग देतात. हे मला योग्य वाटत नाही, असे उज्वल निकम यांनी मला सांगितल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशामध्ये अनेक वकील आहेत. उज्वल निकम यांच्या नियुक्तीवर राजकारण करणे, याचा अर्थ गुन्हेगारांना कुठेतरी मदत करण्यासारखे आहे. त्यांनी केस घेतली की, खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा होतेच, असा उज्वल निकमांचा आजपर्यंतचा इतिहास आहे. कुणाला वाचवाचये असेल, तर उज्वल निकम यांच्या नियुक्तीला विरोध होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले