चित्रपट महोत्सवासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू
पुणे फिल्म फाउंडेशन, सांस्कृतिक विभाग, महाराष्ट्र शासन व दादासाहेब फाळके चित्रनगरी यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान आयोजित करण्यात येत असलेल्या २३ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा(पीफ)तील स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटांची यादी आज महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली.
या स्पर्धेसाठी एकूण ४० मराठी चित्रपटांनी आपला सहभाग नोंदवला. यातून ७ चित्रपटांची अंतिम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. गिराण (दिग्दर्शक – विजय श्रीरंग खुडे), सांगला (दिग्दर्शक – रावबा गजमल), मॅजिक (दिग्दर्शक – रवींद्र विजय करमरकर), सिनेमॅन (दिग्दर्शक – उमेश बागडे), निर्जली (दिग्दर्शक – स्वाती सदाशिव कडू), रावसाहेब (दिग्दर्शक – निखिल महाजन), स्नो फ्लॉवर (दिग्दर्शक – गजेंद्र अहिरे) या ७ चित्रपटातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाची निवड चित्रपट महोत्सवात परदेशी आंतरराष्ट्रीय ज्युरी चित्रपट बघून करतील.
महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम उत्कृष्ट आंतराष्ट्रीय मराठी चित्रपट या स्पर्धात्मक विभागासाठी ५ लाख रुपयांचा रोख पुरस्कार आहे. चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभात हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाईल.
चित्रपट महोत्सवासाठी डेलीगेट नोंदणी प्रक्रिया www.piffindia.com या संकेतस्थळावर सुरू झाली असून, सर्वांसाठी कॅटलॉग फी केवळ रु. ८०० इतकी आहे.