पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाला सुरुवात
देश-परदेशातील 280 व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचा समावेश
शनिवार-रविवारी परिसंवाद, प्रात्यक्षिकांचे आयोजन
पुणे : देश-विदेशातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची दुनिया आज (दि. 17) बालगंधर्व कलादालनात पुणेकरांना पाहण्यासाठी खुली झाली आहे. व्यंगचित्र महोत्सव रविवार, दि. 19 जानेवारीपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सर्वांसाठी खुला आहे. जवळपास 280 व्यंगचित्रकारांची चित्रे यात मांडण्यात आली आहेत.
युवा संवाद सामाजिक संस्थेच्या पुढाकारातून पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार अविनाश भट यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार वैजनाथ दुलंगे, घन:श्याम देशमुख, लहु काळे, गणेश जोशी आणि ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती.
व्यंगचित्र महोत्सवाचे संयोजक, व्यंगचित्रकार धनराज गरड यांनी प्रास्ताविकात उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, कार्टुनिस्ट कंबाईन या संस्थेच्या सहकार्याने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पुण्याच्या सांस्कृतिक पटलावर व्यंगचित्रांच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण करावी याकरीता व्यंगचित्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. शनिवार (दि. 18) आणि रविवारी (दि. 19) व्यंगचित्रांची प्रात्यक्षिके आणि परिसंवादांचेही आयोजन करण्यात आले आहे.
राजकीय, सामाजिक, पर्यावरण, आधुनिक तंत्रज्ञान, प्रदुषण, पाणी टंचाई, जागतिक पातळीवरील युद्ध परिस्थिती अशा विविध विषयांवर मार्मिक टीका-टिप्पणी करणारी व्यंगचित्रे प्रदर्शनात असून महाराष्ट्रासह देश-विदेशातील व्यंगचित्रकारांची प्रतिभा यातून पाहावयास मिळणार आहे.
उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना अविनाश भट म्हणाले, व्यंगचित्रकार त्याच्या चित्राच्या माध्यमातून मोठा आशय व्यक्त करीत असतो. व्यंगचित्रकार हा जन्माला यावा लागतो त्याचे काम सर्जनशील असते. व्यंगचित्रकार समाजातील बारकावे मिश्किल भावातून आपल्या चित्रांद्वारे प्रकट करतो त्याचप्रमाणे समाजातील संवेदनशीलता जीवंत ठेवतो.
वैजनाथ दुलंगे म्हणाले, व्यंगचित्रकला ही गांभीर्याने करण्याची करण्याची गोष्ट असून ती दुधारी तलवार आहे. व्यंगचित्रकाराला राजकीय, सामाजिक तसेच आजूबाजूच्या घटनांचा डोळसपणे, सखोल अभ्यास करावा लागतो. व्यंगचित्रकाराने स्वत:च्या शैलीतून ओळख निर्माण करताना झोकून देऊन मेहनत करणे आवश्यक आहे. हसवसा हसवता विचार करायला लावणारी तर काही वेळा हादरवून टाकणारा आशय मांडणारी अशी ही व्यंगचित्रकला आहे. घन:श्याम देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गरड यांनी केले.