जागर माय मराठीचा, संदेश महाराष्ट्राच्या ऐक्याचा.
पुणे;शुक्रवार दि. १७ जानेवारी रोजी सरहद शाळेच्या प्रांगणात सकाळी ७.३० वाजता मराठीच्या प्रचार व प्रसारार्थ शोभा यात्रेने बाल साहित्य संमेलनाची थाटात सुरुवात झाली.
सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळचे ९८वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत दिल्ली येथील छत्रपती शिवाजी साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडियम) येथे होत आहे. नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरहद मध्ये बाल साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय बाल साहित्य संमेलनाची सुरुवात दि. १७ रोजी सकाळी ७.३० वाजता शोभा यात्रेने करण्यात आली. ग्रंथ पूजन करून शोभा यात्रेस सुरुवात झाली. ढोल-ताशा, टाळ मृदुंग, लेझीम,साहित्यिक व संतांच्या, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील पूर्व प्राथमिक विभागाचे बालचमुही यात सहभागी झाले होते.वाचनाचे महत्त्व, साहित्यिकांचे विचार सांगणारे फलक विद्यार्थ्यांनी हाती घेतले होते.चला चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञाना पुढे होऊ नतमस्तक’ असा संदेश देत, मराठी भाषेचे महत्व सांगणाऱ्या घोषणा विद्यार्थी देत होते.
संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, सचिव सुषमा नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, मुख्याध्यापिका कविता वानखेडे,प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका दिपाली कोंडे, ज्यु.कॉलेजच्या पर्यवेक्षिका रुबीना देशमुख, माध्यमिक विभागाच्या पर्यवेक्षिका स्वाती राऊत, पूर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका पल्लवी पासलकर, सर्व विभागाचे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.