कलायन कल्चरल सेंटर तर्फे भारतीय शास्त्रीय संगीत कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : तबल्याच्या थापेतून निर्माण होणारे मनोहारी ताल, त्याला हार्मोनियमची सुरेल साथ आणि विविध रागांमधून तयार झालेले शास्त्रीय संगीत अशा ताल आणि सुरांच्या मिलापातून संगीतमय सुरेल बैठक रंगली. तन्मय बिच्चू यांनी उस्ताद झाकीर हुसेन यांच्या कल्पनेतून निर्माण झालेली कला रसिकांच्या समोर सादर केली. त्यांचे तबलावादन ऐकून रसिकांना उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबला वादनाचा आनंद मिळाला.
कलायन कल्चरल सेंटर तर्फे कर्वे रस्त्यावरील संस्थेच्या सभागृहामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे शिष्य तन्मय बिच्चू आणि मेहेर परळीकर यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले. अमेय बिच्चू, ऋषिकेश जगताप, सारंग काटकर आणि छाया गोरले यांनी त्यांना साथसंगत केली.
तन्मय बिच्चू यांनी तीन तालातून मैफिलीची सुरुवात केली. अमेय बिच्चू यांनी त्यांना हार्मोनियम वर साथ दिली. नादमय वादन, कठीण लयकारी आणि काव्यमय रचना असे अनेक पैलू उलगडत अप्रतिम तबलावादन तन्मय बिच्चू यांनी केले. मेहेर परळीकर यांनी राग यमन ने आपल्या मैफिलीची सुरुवात केली आणि त्या नंतर राग खामज प्रस्तुत केला. विविध तालातील बंदिश यांनी नटलेल्या त्यांच्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.