- मित्र मंडळ चौकात छत्रपती संभाजीराजेंचे स्मारक व्हावे ही शिवसैनिकांची इच्छा; आयुक्तांना निवेदनाद्वारे केली मागणी..!
पुणे – छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत स्वारगेट जवळील मित्रमंडळ चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभे रहावे ही तमाम शिवसैनिकांची इच्छा असून या मागणीसंदर्भात शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी आयुक्तांची भेट घेवून मागणी केली. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहिल्यास संभाजी राजेंनी धर्मासाठी केलेला त्याग याबाबत निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास ही प्रमोद नाना भानगिरे यांनी व्यक्त केला.
स्वारगेट जवळील मित्र मंडळ चौक येथे जुने झालेले पृथ्वीचे शिल्प असून याची देखभाल, दुरुस्ती व्यवस्थित केली जात नसून या शिल्पातून सामाजिक संदेश अथवा प्रेरणा देखील मिळत नाही, त्यामुळे याठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे 30 फुटाचे भव्य स्मारक उभे व्हावे यासाठी शिवसेना पर्वती विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख महेंद्र जोशी यांनी पुणे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची भानगिरे यांची भेट घेतली होती
यानंतर तत्काळ शंभू राजेंच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून प्रमोद नाना भानगिरे यांनी यासंदर्भात पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची महेंद्र जोशी यांच्या समवेत भेट घेवून मित्र मंडळ चौकात संभाजी महाराजांचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी केली. या मागणी संदर्भात आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली असून याबाबत लवकर कार्यवाही करणार असल्याचा विश्वास दिला असून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभे राहिल्यास या स्मारकातून धर्माभिमान, धर्मरक्षण आणि संभाजी महाराजांनी धर्मासाठी केलेला त्याग याबाबत निश्चितच प्रेरणा मिळेल असे पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.