बारामती:- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक पुरुष विभागात पालघर,पुणे शहर, कोल्हापूर, अहमदनगर, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगर व महिला विभागात ठाणे शहर, सांगली, पुणे शहर, पालघर आपआपल्या गटात विजय मिळविले.
रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळच्या सत्रात पुरूषांच्या अ गटात पालघर संघाने अमरावती संघावर ५३-३२ असा विजय मिळविला. मद्यंतराला पालघर संघाकडे २७-१४ अशी आघाडी होती. पालघरच्या प्रतिक जाधवने आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. अमरावतीच्या अभिषेक पवार याने चांगल्या खेळाचे प्रदर्शन करीत एकाकी लढत दिली. ड गटात पुणे शहर संघाने सांगली संघावर ३५-२७ असा विजय मिळविला. मद्यंतराला पुणे शहर १३-१४ असा पिछाडीवर होता मात्र प्रशिक्षक तुषार नागरगोजे यांनी खेळाडूंना संयम ठेऊन खेळण्यास सांगितले व त्याचा सकारात्मक परिणाम होऊन संघाला विजय मिळाला. पुणे शहर संघाच्या भाऊसाहेब गोरणे यांने चौफेर आक्रमण करीत आपली पिछाडी भरून काढली. तर कर्णधार सुनिल दुबिले याने चांगल्या पकडी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सांगलीच्या जीवन प्रकाश याने उत्कृष्ठ चढाय़ा केल्या. तर कर्णधार अभिषेक गर्ग याने पकडी घेत सामन्यात रंगत आणली.
ब गटात कोल्हापूर संघाने विदर्भातील तगड्या समजल्या जाणाऱ्या वाशिम संघाला ४२-२३ असे पराभूत केले. मद्यंतराला कोल्हापूर संघाकडे १९-१५ अशी आघाडी होती. कोल्हापूरच्या ओमकार पाटील व साहिल पाटील यांना जोरदार चढाया करीत वाशिम संघाला सावरण्यास संधीच दिली नाही. तर आदित्य पोवार व दादाो पुजारी यांनी सुरेख पकडी केला. वाशिमच्या गजानन कुऱ्हे व आकाश चव्हाण यांनी चांगला खेळ केला. ब गटात अहमदनगर संघाने मुबंई शहर पश्चिम संघावर ४७-२४ असा दणदणीत विजय मिळविला. मद्यंतराला अहमदनगर संघाकडे २५-११ अशी आघाडी होती. अहमदनगरच्या आदित्य शिंदे याने चौफेर आक्रमण करीत संघाला विजय मिळवून दिला. तर सौरभ राऊत याने चांगल्या पकडी केल्या. मुंबई शहर पश्चिम संघाच्या जयेश यादव याने काहीसा प्रतिकार केला.
क गटात पिंपरी चिंचवड संघाने भंडारा संघावर ५५-३२ असा सहज विजय मिळविला. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे ३६-१३ अशी आघाडी होती. पिंपरी चिचवडच्या संकेत लांडगे, हर्षद माने यांनी जोरदार खेळ केला. तर विशाल ताटे याने पकडी घेतल्या. भंडाऱ्याच्या पवन शेंडे उत्कृष्ठ चढाया केल्या, व ईश्वर उईके याने पकडी केल्या. ड गटात मुंबई उपनगर पूर्व संघाने यवतमाळ संघाचा ४८-३२ असा विजय मिळविला. मध्यंतराला मुंबई उपनगर पूर्व संघाकडे ३०-१५ अशी आघाडी होती. मुंबई उपनगर पूर्व संघाच्या आकाश रुदेले व सोहम पुंडे यांनी आक्रमक चढाया केल्या. तर अक्षय बरडे यांनी चांगल्या पकडी केल्या. यवतमाळच्या विक्रम राठोड व यशवंत जाधव यांनी चांगला प्रतिकार केला. तर जगदीश राठोड व राहुल भैसरे यांनी पकडी केल्या.
महिला विभागात, ब गटात ठाणे शहर संघाने अमरावती संघावर ५८-१६ असा अकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला ठाणे शहर संघाकडे ३५-८ अशी भक्कम आघाडी होती. ठाणे शहर संघाच्या प्राजक्ता पुजारी व देवयानी पाटील यांनी वेगवान चढाया करीत आपल्या संघाला सहज विजय मिळवून दिला. तर माधुरी गवंडी व जुजा जाधव यांनी उक्तृष्ठ पकडी घेतल्या. अमरावतीच्या स्नेहा चौधरी व कल्याणी मेहेर यांनी चांगला प्रतिकार केला. तर दिव्या शर्मा हिने पकडी केल्या.
ड गटात पुणे शहर संघाने नागपूर ग्रामीण संघावर ६३-१६ असा एकतर्फी विजय मिळविला. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे ३७-८ अशी निर्णायक आघाडी होती. पुणे शहर संघाच्या आम्रपाली गलांडे हिने आक्रमक खेळ करीत कर्णधाराला साजेसा खेळ केला. दिप्ती शिंदे हिने चांगल्या पकडी करीत विजयात हातभार लावला. नागपूर ग्रामीणच्या साक्षी झळके हिने एकाकी लढत दिली.
क गटात पालघर संघाने अकोला संघावर ६६-२० असा सहज विजय मिळवित आपली घोडदौड सुरू ठेवली. मद्यंतराला पालघर संघाकडे ३५-१० अशी भक्कम आघाडी होती. पालघरच्या मोक्षा पुजारी, ज्युली मिस्किता यांनी उत्कृष्ठ चढाया करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शाहिन शेख व श्रृती सोमसे यांनी चांगल्या पकडी केल्या. अकोल्याच्या प्रिती शिरसाठ व आर्या राऊत यांनी चांगली लढत दिली.
अ गटात सांगली संघाने नागपूर शहर संघावर ६१-२२ असा विजय मिळविला. मद्यंतराला सांगली संघाकडे २१-११ अशी आघाडी होती. सांगलीच्या कर्णधार श्रध्दा माळी हिने उत्कृष्ठ खेळ केला. ऋतुजा अंबी हिने चांगला खेळ केला. नागपूर शहरच्या नताशा रोडकर हिने उत्कृष्ठ चढाया केल्या तर ईश्वरी मुळणकर हिने पकडी घेतल्या.
आयोजकांनी केलेल्या अतिशय देखण्या आणि नेटक्या आयोजनाने तमाम कबड्डी रसिक मंत्रमुग्ध झाले. विम्बल्डन स्पर्धेची आठवण व्हावी, अशी मैदानाची आसन व्यवस्था असल्याचे उपस्थित प्रेक्षक सांगत होते.स्पर्धेसाठी आत्याधुनिक मॅटची मैदाने तयार करण्यात आलेली असुन प्रेक्षकांच्या करीता भव्य बैठक गॅलरी उभारण्यात आलेली आहे. ही स्पर्धा साखळी व बाद फेरी पद्धतीने खेळविली जाणार असून सायंकाळी 4.00 ते 8.00 वाजेपर्यंत रेल्वे मैदानावार प्रकाशझोतात सामने होणार आहेत.
छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या इतिहासामध्ये प्रथमच आयोजन समिती मार्फत रोख पारितोषिक रक्कमेमध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली असून सदर स्पर्धेमध्ये खेळाडूंना रु.44.60 लक्षची प्रोत्साहनपर रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. स्पर्धेत महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या वरीष्ठ गट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 12 संघ व विदर्भ कबड्डी असोसिएशनच्या वरीष्ठगट राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेमधील गुणानुक्रमे प्रथम 4 असे एकुण 16 महिला व 16 पुरुष असे एकुण 32 संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धेत एकुण 32 संघामधील खेळाडू, व्यवस्थापक तसेच तांत्रीक अधिकारी मिळुन अंदाजे 548 व्यक्ती सहभागी होणार आहेत.पुणे जिल्ह्यातून पुणे महानगरपालिका,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,पुणे जिल्हा असे एकूण पुणे जिल्ह्याचे 3 संघ सहभागी होणार असून जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अधिकची संधी यामुळे प्राप्त झाली आहे.
प्रतिष्ठेच्या या स्पर्धेत प्रो कबड्डी स्टार-अजित चौहान ,शिवम पठारे, प्रणय राणे, आकाश शिंदे, संकेत सावंत, विशाल ताठे, शंकर गदई, सुनील दुबिले, जयेश महाजन, श्रेयस उबरदंड, आम्रपाली गलांडे, सलोनी गजमल, रेखा सावंत, हरजीत संधू, सोनाली शिंगटे,दिव्या गोगावले, समरीन बुरोंडकर, मंदिरा कोमकर, यशिका पुजारी, कोमल देवकर या पुरुष व महिला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा दर्जेदार व कौशल्यपुर्ण खेळ पाहण्याची सुवर्णसंधी पुणे जिल्ह्यातील कबड्डी रसिकांना प्राप्त झाली आहे.