पुणे दि. १६: जिल्ह्यात ग्रामीण भागात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत. माहिती न दिल्यास असे व्यावसायिक भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे कारवाईस पात्र राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झालेल्या असून जुन्या मोटारसायकली व वाहने यांची खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु याबाबत खरेदी विक्रीचा योग्य तो तपशील ठेवला जात नसल्याने गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांची खरेदी विक्री होण्याची दाट शक्यता असते. खरेदी विक्रीबाबत योग्य तपशील उपलब्ध नसल्याने त्याचा गुन्हे उघडकीस येण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात जुनी वाहने खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून खरेदी विक्री होणाऱ्या वाहनांबाबतची माहिती (वाहन क्रमांक, इंजिन, चासी क्रमांक, मूळ मालकाचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेले ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक, ओळखपत्र, वाहनांचे आरसी, टीसी पुस्तक, खरेदी करणाऱ्याचे नाव, मूळ गावचा व सध्या राहत असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक व ओळखपत्र आदी) दर ७ दिवसांनी स्थानिक पोलीस ठाण्याला द्यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.