- मणिपूर साठी एकजुटीची भावना समग्र भारतात निर्माण करणे हे कर्तव्य – प. पू. स्वामी गोविंद देव गिरी
पुणे : ईशान्य भारताशी आपण मनाने जोडले गेलो आहोत. वेदांचा घोष आणि यज्ञाच्या ज्वाला जिथे थांबल्या तो भाग देशापासून तोडला गेला आहे. यासाठी प्रत्येक ठिकाणी वेदविद्यालय स्थापन करून वेद घोष झाला पाहिजे. त्यामुळेच मणिपूरला वेद विद्यालय स्थापन करण्यात आले आहे. ईशान्य भारताला आपल्यापासून दूर करून चालणार नाही. मणिपूर साठी एकजुटीची भावना समग्र भारतात निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे, आणि हे काम करण्यासाठी गणेशोत्सव मंडळासारखे कोणीही नाही, असे मत प. पू. स्वामी गोविंद देव गिरी यांनी व्यक्त केले.
मणिपूर मधील हिंसाचारामुळे सुमारे साठ हजार नागरिक तात्पुरत्या निवारा केंद्रामध्ये राहत आहेत. त्यांना सहकार्य करण्याच्या भावनेतून पुण्यातील ५१ पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळे एकत्र येऊन, सामाजिक संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने ५ हजार ब्लँकेट्स आणि जेवणाच्या भांड्यांचे ५ हजार संच देण्यात आले. हे साहित्य प्रदान करण्याचा कार्यक्रम पुणे परिवार संस्थेच्या वतीने टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स येथे झाला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, पुणे परिवारचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी उपस्थित होते. खास मणिपूरहून हे साहित्य स्वीकारण्यासाठी मणिपूरचे पुनर्वसन मंडळाचे प्रमुख आमदार थौनाओजम श्यामकुमार, राजेश साहनी हे उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, या देशाची संपूर्ण भूमी आमची आहे. अयोध्या तो झांकी है काशी मथुरा बाकी है म्हणताना काशी मथुरा तर आपलीच आहे आता पीओके बाकी आहे. या भूमीवर आणि संस्कृतीवर होणारी आक्रमणे आपण कधीपर्यंत बघत राहणार यासाठी कोण उभे राहणार असा प्रश्न असताना पुणे आणि महाराष्ट्रातला कार्यकर्ता यासाठी उभा राहतो.
राजकीय भारत हा बाहेरचा तर सांस्कृतिक भारत हा आतला भारत आहे. शासन मणिपूर साठी काम करत आहेच पण त्यांनी केलेल्या कामाची चव वेगळी आणि समाजाने एकत्र येऊन केलेली कामाची चव ही वेगळीच असते. शासन त्यांच्या स्तरावर काम करेल पण समाजाला एकत्र आणण्याचे सामर्थ्य हे केवळ गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले, अनेकवेळा समाज जेव्हा संकटात होता तेव्हा समाजाप्रती असलेल्या जाणिवेतून गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला. ही मदत शहर किंवा राज्या पर्यंत मर्यादित होती, पण आज राज्याच्या बाहेर जाऊन आधाराची गरज असणाऱ्या मणिपूरच्या मदतीला धावून गेले. मानवतेचा संदेश पुण्यातून जातो आहे. मंडळे केवळ उत्सवापुरते मर्यादित नाही तर वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबविले जातात.
मेधा कुलकर्णी म्हणाल्या, भारत देशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आपल्याला एकवाक्यता दिसते. याला कारण आद्य शंकराचार्यांचे भ्रमण या भागात झाले आहे. यामध्ये ईशान्य भाग वगळला गेला. पुण्यातील गणेशोत्सव मंडळे विविध क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनी मंडळाच्या हाकेला साद दिली आहे. मणिपूरच्या नागरिकांशी भावनिक नाते निर्माण करण्याची, नाते जोडण्याची गरज आहे ते काम मंडळे करत आहेत.
टी. एच श्याम कुमार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या जन्म भूमीत येण्याचे भाग्य लाभले. राज्य सरकार मणिपूर सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. केंद्राकडून ही मोदी सरकार खूप सहकार्य करीत आहेत परंतु सध्या ६० हजार नागरिक बांधव अडचणीत आहेत. पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळांनी मणिपूर बांधवांसाठी जी मदत केली आहे त्यातून वस्तू नाही तर मन जुळली जाणार आहेत.
विजय कुवळेकर म्हणाले, कोणत्याही मदतीपेक्षा अधिक. मणिपूरच्या या प्रसंगात भारतीयांनी सहभागी होणे भावना त्यांच्यासाठी महत्वाची आहे. आपली राज्य आपली माणसे यांच्यासाठी काम करणे ही राष्ट्रीय गरज आहेत. या कामासाठी गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते धावून जातात ही महत्त्वाची गोष्ट आहे.
महेश सूर्यवंशी म्हणाले, मणिपूरला मूलभूत गोष्टींची नितांत गरज आहे. राष्ट्रीय एकात्मता वाढावी या हेतू लक्षात ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. हा पहिला टप्पा असून ही मदत पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गरज असेपर्यंत करत राहू.
ॲड. प्रताप परदेशी म्हणाले, कोणतेही संकट आले तरी गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता धावून जातो. कोविडच्या काळात दिवस रात्र काम गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले. पुण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक ऋण फेडायचे काम आम्ही गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून करत आहोत. मणिपूर मधील आपल्या बांधवांना मदत करीत गणेशोत्सव मंडळे सामाजिक कर्तव्य पार पाडत आहेत.
विनायक घाटे यांनी स्वागत केले. ॲड. प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. प्रसाद भारदे यांनी सूत्रसंचालन केले. निलेश पवार यांनी आभार मानले.