माध्यमांशी काळजीपूर्वक वागा -लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्यामुळे माध्यमांशी वागताना विशेष काळजी घेतली जावी. आपल्या हातून एकही चूक होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये भाजपकडून सत्ता केंद्र कशा पद्धतीने चालवले जाते याचेही उदाहरण दिल्याची माहिती आहे.
मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख करून सत्ताधारी आमदारांना त्यांच्यासारखे अभ्यास दौरे काढण्याचा सल्ला दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुंबईच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सकाळी त्यांनी 2 युद्धनौका व एका पाणबुडीचे राष्ट्रार्पण केले. त्यानंतर त्यांनी आशिया खंडातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचेही उद्घाटन केले. तत्पूर्वी, महायुतीच्या आमदारांशी साधलेल्या संवादात त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास उल्लेख केला. राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातचा अभ्यास दौरा केला होता. तसेच दौरे महायुतीच्या आमदारांनी केले पाहिजे, असे ते म्हणाले.
मोदी म्हणाले, आमदारांनी लोकांमध्ये जाऊन मिसळले पाहिजे. विरोधकांवर टीका करण्यापेक्षा त्यांना आपल्या कामातून प्रत्युत्तर द्यावे. आपल्या कामावर लोकांची मते काय आहेत? हे जाणून घ्यावे. इतर राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली झाली असेल तर त्याविषयी अभ्यास दौरे आयोजित करावे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2011 मध्ये गुजरातमध्ये अभ्यास दौरा काढला होता. त्यांच्यासारखे दौरे आयोजित करावेत.
समाजाला वेळ देताना आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. त्यांनाही वेळ द्या. विशेषतः स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. तसेच आपण ठरवलेली कामे निर्धाराने कशी पूर्ण होतील याचेही काटेकोर नियोजन आमदारांनी करायला हवे.
मोदींनी आमदारांना महायुती म्हणून संघटना वाढवण्यावर भर देण्याचाही सल्ला दिला. ते म्हणाले, आमदारांनी संघटना म्हणून महायुती वाढवण्यावर भर द्यावा. मतदारसंघात घटकपक्षातील आपले जे आमदार व पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना भेटी द्याव्यात. महायुतीचा एकोपा वाढवण्यासाठी गावोगावी डब्बा पार्टीचे आयोजन करावे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवरही उपरोधिक टीका केली. यासंबंधी त्यांनी काँग्रेसने अनेक वर्षे आपली सत्ता कशी टिकवली हे समजून सांगितले. काँग्रेस एका पंचवार्षिकमध्ये रस्ता तयार करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये ती जनतेला रस्त्याचा नकाशा दाखवते. अखेर तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करते. काँग्रेसने या पद्धतीने वर्षानुवर्षे आपली सत्ता सांभाळली, असे ते म्हणाले.