पुणे – भाजपचे नेते आणि प्रसिद्धी यंत्रणा लोहगाव विमानतळ टर्मिनल च्या निमित्ताने प्रसिद्धीचा सोस भागवून घेत आहेत. परंतु प्रवाशांना अद्यापही सुविधांपासून वंचितच रहावे लागत आहे, अशी टीका माजी आमदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
विमानतळावरील गर्दी टाळणे आणि प्रवाशांना प्रवासासाठी सुलभ व्यवस्था करून देणे यात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना नागरी विमान वाहतूक खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले. त्यानंतर मोहोळ यांनी टर्मिनल ची पहाणी करून मोठा गाजावाजा केला. ऑगस्टमध्ये टर्मिनल कार्यान्वित झाले. अद्यापही प्रवाशांसाठी सुविधाच उपलब्ध करून दिलेल्या नाहीत, असे मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
विमानतळ टर्मिनलवर ॲपद्वारे नोंदणी केल्यावरही रांग न लावता प्रवेश करण्यासाठी डिजीयात्रा काउंटरची सुविधा अद्याप उपलब्ध नाही. अन्य आऊटलेटचे काम झालेले नाही. सिक्युरिटी काउंटर्स आहेत. पण, पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी प्रत्येकी फक्त दोन काउंटर्स उपलब्ध असल्याने रांगेत थांबावे लागते. हे टर्मिनल अद्याप आंतरराष्ट्रीय दर्जाचे झालेले नाही, अशी टीका मोहन जोशी यांनी केली आहे. भाजपच्या नेत्यांनी प्रसिद्धीचा सोस न करता प्रवाशांना सुविधा मिळतील याकडे लक्ष द्यायला हवे, अशी मागणी मोहन जोशी यांनी केली आहे.

