मुंबई-दाऊदच्या हस्तकांना प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा दहशतवादी याच्या एन्काऊंटर प्रकरणी तडीपारी बरी असा टोला भाजपचे नेते विनोद तावडे यांनी शरद पवार यांना लगावला आहे. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर तडीपारीवरुन टीका केली होती.
अमित शहांनी शिर्डीच्या अधिवेशनात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलास होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, अमित शहा यांनी थोडीफार माहिती घेऊन भाषण केले तर लोकांच्या मनात शंका निर्माण होणार नाही. देशात आजपर्यंत अनेक गृहमंत्री झाले ज्यांनी पदाची प्रतिष्ठा वाढवली, असे ते देशभक्त होते. आपण तडीपार असा गृहमंत्री पाहिलेला नाही असा टोला त्यांनी शहांना लगावला. गुजरातमध्येही अनेक प्रशासक होऊन गेले. या सगळ्या प्रशासकांचे वैशिष्ट्य होते, की यापैकी कुणालाही तडीपार केले गेले नव्हते.भाजपचे नेते विनोद तावडे म्हणाले की, दाउदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल. अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा पवार साहेब विसरले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्राच्या विजयाने 1978 पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचे जे राजकारण होते ते 20 फूट गाडण्याचे काम केले. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, 2019 ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. 1978 ते 2024 पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचे राजकारण सुरु होते. ते जनतेने संपवून दाखवले.