मुंबई-अमित शहांचे भाषण आणि भापजचे अधिवेशन शरद पवारांच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. शरद पवारांचा कुठेतरी तोल जाऊ लागलाय याची चिंता वाटते. शरद पवारांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा अमित शहांच्या तडीपारीची भाषा केली. हीच भाषा आणि अशाच वक्तव्यांमुळे शरद पवारांना, त्यांच्या पक्षाला, मित्रपक्षाला आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्राने हद्दपार केले आहे, असा घणाघात भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. तुम्ही जुन्या प्रकरणांवरून बोलत असाल, तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला.
शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत अमित शहांच्या टीकेवर पलटवार केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद आहे. देशाच्या इतिहासात अनेक जण गृहमंत्री झाले पण आतापर्यंत कुणालाही तडीपार करण्यात आले नाही, असे म्हणत शरद पवार यांनी शहा यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे.
न्यायालयात निर्दोषत्व मिळालेल्या अमित भाईंबद्दल वारंवार अशाप्रकारे उल्लेख करणे हे न्यायिक प्रक्रियेला धरून नाही. तरीही याबाबत तुम्ही विधान करणार असाल, तर आम्हालाही लवासाची फाईल उघडावी लागेल. ती वेळ तुम्ही आणू देऊ नका. लवासाबाबत कोर्टाने दिलेले निर्देश, त्यातील शंका आणि वलय ही चार बोटे कोणाकडे येतात हे लक्षात ठेवा, असा इशारा आशिष शेलार यांनी दिला. लवासापासून बऱ्याच प्रकरणाचे संकेत कोणाकडे जातात हे बोलायची वेळ आणू नका, असेही शेलार यांनी म्हटले.
तुमची जनसंघ आणि भाजपशी जवळीक होती, हे आज तुम्हीच मान्य केले. कधी कधी सत्य समोर येते. जनसंघाच्या जीवावर तुम्ही सरकार बनवले, हे तुम्ही मान्य केले. जरा आणखी खरे बोला. ते सरकार बनवण्यापूर्वी विश्वासघाताचे कुठले बीजारोपण तुम्ही केले होते? असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला. कुठल्या नेत्याच्याविरोधात तुम्ही काय केले होते. विश्वासघातकी संस्कृतीचे जनक 45 वर्षापूर्वी कोण होते? ते सत्यही समोर आणा. स्वत: महाराष्ट्रातून हद्दपार झालेल्यांनी तडीपारीची भाषा करू नये, अशी टीका शेलार यांनी केली.
आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. विश्वासघातकी राजकारणाचे ट्रेनिंग उद्धव ठाकरे घेत आहेत हे 2019 ला महाराष्ट्राने पाहिले. महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. महाविकास आघाडी फुटणार असे आधीच सांगितले होते. स्वार्थासाठी, सत्तेसाठी एकत्र आले ते आता बाजूला होत आहेत. महाराष्ट्राच्या भल्यासाठी मविआतील लोक एकत्र आले नव्हते. आता त्यांचा स्वार्थ संपल्यामुळे ते दूर जात आहेत, असा टोलाही आशिष शेलार यांनी मविआ नेत्यांना लगावला.