पुणे : पुण्यातील अनुग्रह फौंडेशनतर्फे दिव्यांगांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील उत्सव हॉलमध्ये आयोजित शिबिरात 110 पेक्षा जास्त दिव्यांगांची तपासणी करण्यात आली.
अनुग्रह फौंडेशन गेल्या 11 वर्षांपासून दिव्यांगांसाठी कार्यरत आहेत. संस्थेतर्फे प्रथमच मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, असे संस्थेच्या संचालक मंडळ सदस्या सीमा पाटील यांनी सांगितले. या शिबिरात मतिमंद मुलांचा जास्त सहभाग होता. शिबिरात बालरोगतज्ज्ञ डॉ. ईशा देशमुख, विशेष मुलांच्या तज्ज्ञ डॉ. जाई जोशी, हृदय विकार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र पाटील, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा देवधर, मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चिन्मय कुंभार, दंतचिकित्सक डॉ. रणजीत फाळके, डॉ. प्रतिभा पंडित, फिजिशियन डॉ. वृषाली नाईक, नेत्र विकार तज्ज्ञ डॉ. अरविंद भावे, डॉ. शिल्पा पाटील, डॉ. जयेश पाटील यांनी दिव्यांगांची तपासणी केली.
वैशाली भीमपुरे, दिपाली विद्वांस, माधुरी पटवर्धन व बबिता शुक्ल यांनी दिव्यांग मुलांच्या थेरपी, शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली. पालक समुपदेशक पल्लवी इनामदार व आनंद कुलकर्णी यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सर्व मुलांना मोफत औषधे, काही वस्तू व पालकांसाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिकेचे वाटप करण्यात आले. तसेच आयुष गुरव या मुलाला व्हिलचेअर देण्यात आली. दिव्यांगांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती या वेळी देण्यात आली.
यूडीआयडी कार्ड, निरामय विमा योजना, महापालिकेकडून मिळणारे पेंशन, कायदेशिर पालकत्व याचे अर्ज या वेळी भरून घेण्यात आले. एका छताखाली 18 विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. अशा पद्धतीचा शहरात पहिल्यांचा उपक्रम राबविण्यात आला.
शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाल्याने भविष्यात शहराच्या विविध भागात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले जाणार असल्याचे रुपाली परांजपे आणि डॉ. वृषाली देहाडराय यांनी सांगितले.