पुणे : दि. बा. मोकाशी यांच्या ‘आता आमोद सुनासि आले’ या कथेवर आधारित ‘दास्तान ए रामजी’ या अनोख्या प्रयोगाद्वारे अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी यांनी रसिकांना जन्ममृत्यूचा पट उलगडणाऱ्या कथेत खिळवून ठेवले. सृजन फाऊंडेशन आयोजित सृजन महोत्सवातील दुसऱ्या दिवशी (दि. 14) हा अनोखा कार्यक्रम सादर करण्यात आला.
केंबळ खेड्यात पावसाने अनेक दिवस धरलेली संततधार, त्यामुळे गावातील नदीला आलेला पूर, त्यातच वाहून गेलेला रामजी लोहाराचा मुलगा, त्यामुळे रामजीच्या आयुष्यात साचलेले दु:ख, नियतीचा खेळ भोगताना रामजीला आलेले रिकामपण, वारसाहीन झालेले आपले घराणे, 30 वर्षांहून अधिक काळ केलेली पंढरीची वारी, ज्ञान-अज्ञानाच भेद कथन करणारी ज्ञानेश्वरी असे अनेक पैलू असणाऱ्या या कथेचे प्रभावी सादरीकरण अनुभवताना रसिक त्या कथेशी, पात्रांशी एकरूप झाले आणि ते जणू ही कथा जगले.
दु:खात कुठलेही शब्द समाधान देत नाहीत हे वास्तव मांडताना लेखकाने रामजीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक घटनांचे आणि पात्रांचे अतिशय चपखल वर्णन केले आहे. काही घटना व प्रसंगातून रामजीला अज्ञेयाशी झटपट करून आपल्या आयुष्यातील गमावलेले क्षण परत मिळविण्याचा प्रयत्न करणे आणि त्यातून काही क्षणांकरीता सृजनाचा आनंद मिळविणे याचे भावपूर्ण वर्णन कलाकारांनी अतिशय तन्मयतेने सादर करून रसिकांना कथानकाशी पूर्णवेळ खिळवून ठेवले.
या अनोख्या प्रयोगाविषयी माहिती सांगताना अक्षय शिंपी म्हणाले, मनोरंजनाची साधने उपलब्ध नसतानाच्या काळात मौखिक परंपरा जपत कथामालिका सांगत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी उर्दू भाषा परंपरेत अशा प्रकारे सादरीकरण केले जात असे. सादरीकरणाचा हा प्रकार पर्शिया येथून भारतात आला आणि अवध प्रांतांत स्थिरावला त्यामुळे आम्ही अवध प्रदेशातील व्ोशभूषा परिधान करून सादरीकरण करत आहोत.
कलाकारांचा सत्कार सृजन फाऊंडेशनचे उपाध्यक्ष पोपटलाल शिंगवी यांनी तर प्रास्ताविक फाऊंडेशनचे अध्यक्ष अधीश प्रकाश पायगुडे यांनी केले.
महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी उद्या (बुधवार, दि. 15) सृजन फाऊंडेशन आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या सृजन-कोहिनूर गौरव पुरस्काराने नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष विठ्ठल काटे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार यांच्या हस्ते होणार असून प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती असणार आहे.