पुणे-दिल्ली मेट्रो स्टेशन येथे एअर इंडियाच्या काऊंटरवर बॅग दिल्यानंतर पुणे विमानतळावर बॅग परत घेतली असता बॅगेतील १ लाख ८० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत प्रसन्न विजय नहार (वय ४२, रा. यमुनानगर, निगडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार दिल्ली ते पुणे विमान प्रवासात १२ जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते १३ जानेवारी रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या दरम्यान घडला.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फियार्दी हे दिल्ली ते पुणे विमानाने प्रवास करत होते. त्यांनी न्यू दिल्ली मेट्रो स्टेशन येथे एअर इंडिया कंपनीचे काऊंटरवर बॅग चेक इन साठी बॅग दिली. त्यानंतर ते पुणे विमानतळावर उतरले. बेल्ट नं. ३ वरुन त्यांनी बॅग घेतली. बॅग उघडली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बॅग तपासली असता बॅगेत ठेवलेले १ लाख ८० हजार ४५० रुपये चोरीला गेल्याने लक्षात आले. दिल्ली ते पुणे विमान प्रवासात ही चोरी झाली.
विमान प्रवासात बॅगेतील रोकड, वस्तू चोरीला जाण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी दुबई ते पुणे विमान प्रवासात प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून त्यातील वस्तू चोरीला गेल्या प्रकरणी दोन गुन्हे विमानतळ पोलीस ठाण्यात नोंदविले गेले आहेत. त्याचा तपास लागला नसताना आता तिसर्या चोरीची घटना समोर आली आहे.