पुणे-पेट्रोल पंपावरील साडेतीन लाख रुपयांची कॅश बँकेत भरण्यासाठी पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मॅनेजरला मारहाण करुन पैशांची बॅग तिघा चोरट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. या चोरट्यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली तरी त्यांनी पैशांची बॅग काही सोडली नाही. तेव्हा ते चोरटे पळून गेले.
याबाबत सलीम सिंकदर शेख (वय ३१, रा. खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातफिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिघा चोरट्यांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कात्रजमधील माऊलीनगरमधील जनता सहकारी बँकेसमोर सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याबाबत सलीम शेख यांनी सांगितले की, कात्रज कोंढवा रोडवरील ए एम के इंटरप्राईज यांच्या पेट्रोल पंपावर गेली १० वर्ष ते मॅनेजर म्हणून काम करतात. पेट्रोल पंपावरील कॅश ते नेहमी पायी चालत जवळच असलेल्या जनता बँकेत भरणा करतात. सोमवारी पेट्रोल पंपावर दोन दिवसांची ३ लाख ४६ हजार रुपयांची कॅश बँकेत भरणा करण्यासाठी नेहमीप्रमाणे ते जात होती. पेट्रोल पंपावरुन त्यांनी रोड क्रॉस करुन समोरील फुटपाथवर आले. फुटपाथवरुन जनता बँकेत जात असताना एकाने त्यांना माऊलीनगरचा पत्ता विचारला. त्यांनी त्याला हेच माऊलीनगर आहे. तुम्हाला कोठे जायचे, असे विचारले. तोपर्यंत दोघे जण त्यांच्यापर्यंत आले. त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी बॅग काही सोडली नाही. त्यांनी हाताने व लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यात मारहाण करुन जखमी केले. तरीही त्यांनी पैशांची बॅग शेवटपर्यंत सोडली नाही. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक जमा होत असल्याचे पाहून हे तिघे चोरटे पळून गेले.
सलिम शेख यांनी तातडीने ही बाब पोलिसांना कळविली. हे तिघेही चोरटे साधारण १९ ते २३ वर्षाचे असावेत. त्यांनी पाळत ठेवून जबरी चोरीचा प्रयत्न केला, पण सलिम शेख यांनी हातातील बॅग न सोडल्याने शेवटी ते तसेच पळून गेले.
याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले की, चोरट्यांनी मारहाण केली तरी सलिम शेख यांनी पैशांची बॅग सोडली नाही. या चोरट्यांचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यावरुन चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.