इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने आयोजन ; शेकडो दीप प्रज्वलित करून गौरवशाली इतिहासाचे जागरण
पुणे : भारताच्या इतिहासात २६४ वर्षांपूर्वी झालेल्या पानिपत रणसंग्रामातील वीरांना मानवंदना देण्यासाठी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या समाधीसमोर दीपमानवंदना हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित नागरिकांनी शेकडो दीप प्रज्वलित करून आपल्या गौरवशाली इतिहासाचे जागरण केले.
निमित्त होते, इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित पानिपत रणसंग्रामातील वीरांना ‘दीप मानवंदना’ या कार्यक्रमाचे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष व इतिहास अभ्यासक मोहन शेटे, हर घर सावरकर समितीचे विद्याधर नारगोळकर, पर्वती संस्थानचे रमेश भागवत, रायगड स्मारक मंडळाचे सुधीर थोरात यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मोहन शेटे म्हणाले, दि. १४ जानेवारी १७६१ हा मराठ्यांच्या इतिहासातील विलक्षण दिवस होता. राष्ट्राच्या रक्षणासाठी मराठी वीरांनी पानिपतच्या रणभूमीवर पराक्रमाचे रण तांडव मांडले होते. अफगाणिस्तान च्या बादशाहाने नजीबखानच्या बोलावण्यावरुन भारतावर आक्रमण केले होते. अशा वेळेस श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी सदाशिवभाऊ आणि विश्वासराव यांच्या नेतृत्वाखाली मराठी सैन्य उत्तरेला रवाना केले. मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, इब्राहिमखान गारदी , समशेर बहाद्दर, विंचुरकर, पवार, गायकवाड,पायगुडे असा महाराष्ट्राचा शौर्य सागर पानिपतावर उभा ठाकला होता.
ते पुढे म्हणाले, दि. १४ जानेवारी १७६१ ला त्या महाभयंकर रणसंग्रामाला सुरवात झाली. दुपार पर्यंत विजयाची आशा दिसत असताना अचानक पारडे फिरले आणि दारुण पराभव झाला. मराठी तरुणाई भस्मसात झाली. मात्र, तरीही हा पराभव मराठ्यांना अपमानास्पद नव्हता. राष्ट्राच्या रक्षणासाठी मराठे कशाप्रकारे चिवट लढा देतात, हे सा-या जगाने अनुभवले. या युद्धानंतर भारतावर कधीही त्या दिशेने आक्रमण झाले नाही, असेही त्यांनी सांगितले. पानिपतच्या रणभूमीवर बलिदान करणा-या नरवीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अभिनव कलाभारती च्या वतीने रंगावली काढण्यात आली.