दिल्ली: काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बदायु जिल्ह्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. येथील बिल्सीचे भाजप आमदार हरिश शाक्य यांच्यासह 16 जणांनी एका महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप झाला होता. जमीनीच्या वादातून झालेल्या वादानंतर हा अत्याचार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी भाजपच्या आमदारासह त्यांचे बंधू आणि इतर काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना ताजी असताना आता भाजपच्या एका बड्या नेत्यासह काही पदाधिकाऱ्यांनी एका अभिनेत्रीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मोहन लाल बडौली असं गुन्हा दाखल झालेल्या भाजपच्या बड्या नेत्याचं नाव आहे. ते हरियाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे. बडौली यांच्यासह एक गायक आणि भाजपचा माजी नेता रॉकी मित्तल यांच्याविरोधात बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमाचलच्या कसौली पोलीस स्टेशनमध्ये 13 डिसेंबरला हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका अभिनेत्रीवर अशाप्रकारे बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मोहन लाल बडौली यांनी आरोप फेटाळले हा राजकीय स्टंट असून संपूर्ण प्रकरण खोटं —मोहन लाल बडौली आणि रॉकी मित्तल या दोघांनी 7 जुलै 2023 ला पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. रॉकी मित्तलने आपल्याला अभिनेत्री बनवतो असं सांगितलं तर बडौलीने सरकारी नोकरी लावतो, असं सांगून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोपही तिने केला आहे. दरम्यान, मोहन लाल बडौली यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले आहेत. हा राजकीय स्टंट असून संपूर्ण प्रकरण खोटं आहे, या प्रकरणामध्ये काहीही सत्य नाही, असा दावा मोहन लाल बडौली यांनी केला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी पीडित अभिनेत्रीला आधी दारू पाजली आणि त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर भाजपच्या या नेत्यांनी पीडित अभिनेत्रीचे बलात्कार केल्यानंतर नग्न फोटो आणि व्हिडीओ काढल्याचा आरोप देखील तक्रारदार महिलेकडून करण्यात आला आहे. अशाप्रकारे हरियाणातील एका बड्या नेत्यावर अत्याचाराचे आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.