पुणे: पुणे ते अयोध्या या ‘मिशन रस्ते सुरक्षा’ सायकल वारी दरम्यान सध्या वारी मध्यप्रदेशातील ब्यावराला पोहोचली आहे. या उपक्रमाचे ब्यावरा पोलीस आणि स्थानिक नागरिकांकडून भरभरून स्वागत आणि कौतुक होत आहे.
पुण्याचे सायकलस्वार नारायण पवार आणि सुयोग शहा हे रस्ते सुरक्षा नियमांचे महत्त्व पटवून देत विविध गावांत जनजागृती करत आहेत. हेल्मेट वापरणे, वाहन चालवताना सतर्कता बाळगणे, आणि योग्य वेग राखणे यासंबंधी त्यांनी स्थानिक नागरिकांना मार्गदर्शन केले.
ब्यावरा पोलीस प्रशासनाने या उपक्रमाचे कौतुक करत, अशा मोहिमांमुळे समाजात रस्ता सुरक्षेची जाणीव वाढेल, असे मत व्यक्त केले. स्थानिक नागरिकांनीही या वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
वारीने केवळ जनजागृतीच केली नाही तर स्थानिकांचेही मने जिंकली आहेत. सायकलस्वारांच्या अथक प्रयत्नांमुळे अपघात टाळण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याचे दिसून येत आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना चालना देण्याचा निर्धार सायकलस्वारांनी व्यक्त केला आहे.