,पुणे:-
हिंदुत्वादी विचारधारेवर राजकीय वाटचाल करणारा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची छुपी यूती बहुजनांसाठी घातक असल्याचा दावा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी सोमवारी (ता.१३) केला. बहुजनांच्या मतविभाजनासाठी करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या प्रयोगात भाजप यशस्वी झाला आहे. महाप्रचंड विजयानंतर आता पुन्हा भाजप-उद्धव ठाकरे सोबत येणार असल्याचे चित्र दृष्टीपथात येत असल्याचा दावा देखील डॉ.चलवादींनी केला.
सत्ताधारी आणि विरोधक जेव्हा ‘समविचारी’ असतात तेव्हा सामाजिक बदलाची आणि समतेची अपेक्षा केली जावू शकत नाही.प्रस्थापित राजकीय पक्षांनी सदैव बहुजनांची अवहेलनाच केली आहे. साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर करून ते बहुजनांना सत्तेपासून दूर ठेवतात. राजकारणातील बहुजनांचा राजकीय ‘अनुशेष’ संपवायचा असेल, तर बहुजन समाज पक्ष एकमेव ‘विचारपीठ’असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले. मान्यवर कांशीराम जी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांच्या ‘सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ या विचारानूसार तळागाळातील पीडित, शोषित, वंचित आणि उपेक्षितांना ‘शासनकर्ती जमात’बनवायचे असेल, तर प्रस्थापितांविरोधात एकत्रित राजकीय लढा द्यावाच लागेल.
ईव्हीएमची खेळी करीत मतदारांचे मत हस्तगत करणार्या पक्षांना यंदा बहुजन समाज जागा दाखवेल. निवडणूक आयोगाने होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी देखील डॉ.चलवादी यांनी केली.बहुजन समाज पक्ष भाजप, शिवसेना असो वा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसला त्यांच्या बहुजन विरोधी प्रयोगात आता यशस्वी होवू देणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसपा तळागाळातील जनमानसात जात प्रस्थापित राजकीय पक्षांचे मनसुबे बहुजनांसमोर मांडणार आहे.