पुणे:ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांतून पुणे ते अयोध्या सायकल वारी सुरू असून, ‘मिशन रस्ते सुरक्षा’ उपक्रम अंतर्गत सायकलस्वार आणि स्थानिक नागरिक रस्ते सुरक्षा संबंधी जनजागृती करत आहेत. सायकल वारीत सहभागी झालेले सायकलस्वार नारायण पवार आणि सुयोग शहा हे विविध गावांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांचा प्रचार करत आहेत.
वारीत विविध ठिकाणी नागरिकांनी सायकलस्वारांचे जल्लोषात स्वागत केले आहे. सायकलस्वारांनी रस्ते सुरक्षा नियमांचे फलक हातात घेऊन नागरिकांना मार्गदर्शन केले आहे. रस्ता सुरक्षित ठेवण्यासाठी, वाहन चालवताना खबरदारी घेण्याचे महत्त्व, हेल्मेट वापरणे, तसेच वाहने योग्य वेगात चालवणे यासंबंधी नागरिकांना सूचना दिल्या जात आहेत.
स्थानिक नागरिक, विशेषतः युवक आणि विद्यार्थी, या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रस्ते सुरक्षा मोहिमेत सहभागी होऊन रस्ते सुरक्षेचे महत्त्व सांगत आहेत आणि नियम पाळण्याचा निर्धार करीत आहेत . ‘मिशन रस्ते सुरक्षा’ उपक्रमाने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली असून, या उपक्रमाला सतत पाठिंबा मिळत आहे.
सायकल वारी ज्या गावांमधून जात आहे, तेथे स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उपक्रमाचे स्वागत केले आहे. त्याचबरोबर, या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढत असून, स्थानिकांनी रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे वचन दिले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून रस्ता अपघात कमी होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. ‘मिशन रस्ते सुरक्षा’ उपक्रम आपल्या कार्यास आकार देत आहे, आणि भविष्यातही या प्रकारच्या उपक्रमांना पुढे चालवण्याचा निर्धार नारायण पवार आणि शहा यांनी व्यक्त केला आहे.