पुणे : प्रत्येकाला उत्तम बोलता आले पाहिजे. निरीक्षण, स्मरण आणि लोकांशी उत्तम संपर्क हवा. तुमचे कार्यक्षेत्र बळकट करण्यासाठी माणसांना जोडा. स्वतःचा आत्मविश्वास बळकट करा. तुमची वेगळी छटा दाखवली तर कितीही मोठी व्यक्ती असली तरी ती तुम्हाला जवळ करते, असे मत प्रख्यात निवेदक सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त केले.
वल्लरी प्रकाशनाच्यावतीने ‘महाराष्ट्राचे महावक्ते’ म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. डॉ. सुनिल धनगर यांच्या जीवन संघर्षावर व्यंकटेश कल्याणकर लिखित ‘शब्दजादूगार सुनिल’ या पुस्तकाचे प्रकाशन आणि कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन स.प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये करण्यात आले होते. यावेळी सुप्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरु प्रा.पराग काळकर, लेखिका दिग्दर्शिका प्रतिमा पंकज, वल्लरी प्रकाशनाचे व्यंकटेश कल्याणकर उपस्थित होते.
सुधीर गाडगीळ म्हणाले, उत्तम बोलण्यासाठी नियमित डायरी लिहायला हवी. उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तमोत्तम वक्त्यांना ऐकायला पाहिजे.
प्रा. पराग काळकर म्हणाले, पुण्यात विविध ठिकाणाहून माणसे येतात आणि कायमचे पुणेकर होतात. परंतु जोपर्यंत तुम्ही तुमचे कर्तृत्व दाखवत नाही, तोपर्यंत पुणे तुम्हाला स्वीकारत नाही. या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो, परंतु छोटे छोटे प्रयत्न करत राहणे आणि सातत्य ठेवणे गरजेचे आहे. तुमचे अस्तित्व दाखवून द्यावे लागते. आयुष्यात पुढे जाताना अनेक अडथळे येतात, परंतु जीवन प्रवाहित असणे आवश्यक आहे.
डॉ. सुनिल धनगर म्हणाले, ग्रामीण भागातून येऊनही आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादांमुळे वॉचमनपासून सुरू झालेला माझा प्रवास आज माझ्यावरील पुस्तक प्रकाशनापर्यंत येऊन पोहोचला आहे. हा आयुष्यातील एक कृतार्थ ठेवा आहे.
व्यंकटेश कल्याणकर म्हणाले, सुनील धनगर यांचे आयुष्य प्रेरणादायी आहे. तरुणांनी आदर्श ठेवावा असे यश त्यांनी मिळवले आहे. त्यामुळे ‘शब्द जादूगार सुनिल’ हे पुस्तक प्रत्येकाने अवश्य वाचावे. आपले वाचन झाल्यानंतर हे पुस्तक जवळच्या वाचनालयास किंवा इतरांना वाचायला द्यावे.
हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. किर्ती देसाई यांनी स्वागतगीत व पसायदान सादर केले. व्यंकटेश कल्याणकर यांनी प्रास्ताविक आणि आभार मानले.