पुणे : संगीत प्रचार व प्रसाराचे अविरत कार्य करणाऱ्या गोपाळ गायन समाज या संस्थेतर्फे युवा कलाकारांसाठी घेण्यात आलेल्या पळणीटकर आणि चिंतामणी स्मृती चषक शास्त्रीय गायन स्पर्धेत सागर देशमुख याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यास पळणीटकर चषक व 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेत 32 जणांचा सहभाग होता. स्पर्धा गोपाळ गायन समाज येथे झाली. द्वितीय क्रमांक वरद दलाल आणि सोजी जॉर्ज मॅथ्यू यांना विभागून देण्यात आला. त्यांना चिंतामणी चषक आणि पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. विशेष प्रस्तुतीसाठीचे पारितोषिक पियूषा भोसले हिला मिळाले. तिला पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. राजश्री महाजनी आणि डॉ. वीणा धामणगावकर यांनी केले. स्पर्धकांना दीपेन दास, गजानन इगवे, उदय शहापूरकर, आकांक्षा केळकर यांनी साथसंगत केली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण प्रसिद्ध गायक पं. विजय कोपरकर आणि पं. राजेंद्र कंदलगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. संस्थेच्या विश्वस्त डॉ. अरुणा चाफेकर उपस्थित होत्या.
स्पर्धकांशी संवाद साधताना पंडित विजय कोपरकर म्हणाले, तानपुऱ्याची साथ कधी सोडू नका. तपश्चर्या आणि मेहनतीशिवाय गाणे खुलत नाही. संगीत हा सुरांचा महासागर आहे. आपल्या गळ्याची क्षमता काय आहे हे जाणून घेऊन गायले पाहिजे.
पंडित राजेंद्र कंदलगावकर म्हणाले, संगीताची साधना करताना गाणे ऐकणेही खूप महत्त्वाचे आहे. गायन क्षेत्रात चिंतन-मननही आवश्यक असते. गायनाची सौंदर्यपूर्ण मांडणी करणे व सतत बदल घडवत राहणे आवश्यक असते.
प्रसिद्ध हार्मोनियम वादक उपेंद्र सहस्रबुद्धे यांना डॉक्टरेट मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार गोपाळ गायन समाजाचे विश्वस्त, गायक डॉ. विकास कशाळकर, डॉ. अरुणा चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आला.