पुणे, दि. १३ जानेवारी २०२५: महावितरणच्या पुणे परिमंडलाचे कर्मचारी व उत्कृष्ट खेळाडू गुलाबसिंग वसावे (शिवाजीनगर विभाग) व प्रतिक वाईकर (पर्वती विभाग) यांनी थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भरारी घेतली आहे. कर्नाटकातील आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत गुलाबसिंग वसावे यांनी भारताला दोन सुवर्ण तर एक रौप्यपदकाची कमाई करून दिली. तर प्रतिक वाईकर यांची खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.
मंगरूळ (कर्नाटक) येथे दि. १० ते १२ जानेवारी दरम्यान आयोजित साऊथ एशिया मास्टर्स ओपन अॅथलेटिक्स स्पर्धेत धावपटू गुलाबसिंग वसावे यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. यात त्यांनी २०० आणि ४०० मीटर धावस्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. तर ४×४०० रिले धावस्पर्धेत रौप्यपदक मिळवले. या स्पर्धेत भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, भूतान आदी देशातील सुमारे दोन हजार क्रीडापटू सहभागी झाले होते.
तसेच प्रतिक वाईकर यांना खो-खो वर्ल्ड कप स्पर्धेत १५ सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करण्याचा मान मिळाला आहे. भारत, अमेरिका, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पोलंड, दक्षिण कोरिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आदी तब्बल २० देशांच्या सहभागाची खो-खो वर्ल्ड कप २०२५ स्पर्धा दि. १३ ते १९ जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. महाराष्ट्र शासनाचा श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त असलेले प्रतिक वाईकर यांचा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत दबदबा आहे. एक उत्कृष्ट खो-खोपटू म्हणून त्यांचा देशात नावलौकिक आहे.
महावितरणचे श्री. गुलाबसिंग वसावे व श्री. प्रतिक वाईकर यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र, संचालक (संचालन) श्री. अरविंद भादिकर, पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे व मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी कौतुक केले आहे.
श्री. राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, पुणे परिमंडल– ‘गुलाबसिंग वसावे यांनी वैयक्तिक कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत २ सुवर्ण पदक पटकावले. तर प्रतिक वाईकर खो-खोच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करीत आहे ही कामगिरी महावितरणसाठी अतिशय गौरवाची व अभिमानाची आहे. दोघेही अतिशय मेहनती आहेत. नियमित सरावातून त्यांना हे यश मिळाले आहे. गुलाबसिंग यांनी २ सुवर्णपदकांची कमाई केली तर प्रतिक यांच्या नेतृत्वात खो-खोच्या वर्ल्डकपचा भारतीय संघ मानकरी ठरेल अशी खात्री आहे’.