पुणेः – भारतीय धार्मिक परंपरा आणि संस्कृती ही आपल्या ऐतिहासिक आणि सामाजिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. ह्या हजारो वर्षांच्या धार्मिक परंपरेला निधर्मी करणे हा करंटेपणा होता, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांनी केले.
भारतीय संस्कृती संगम, पुणे आणि आयडियल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सांस्कृतिक व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात “संतांची सामाजिक समरसता” या विषयावर डॉ. अभ्यंकर बोलत होते. या वेळी त्यांनी संतांच्या जीवनधारणा आणि त्यांच्या शिकवणीच्या माध्यमातून समाजातील समरसतेला प्रोत्साहन देण्याच्या विचारांची मांडणी केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी अध्यक्ष स्थानी होते.
‘निधर्मी’ पद्धतीला अप्रत्यक्षपणे हल्ला करत डॉ अभ्यंकर म्हणाले, “ह्या धार्मिक परंपरेला केवळ आधुनिक दृष्टिकोनातून पाहणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय. समाजाच्या ऐतिहासिक वारशाशी जोडलेली मूल्ये जपणे आवश्यक आहे, अन्यथा ती आपल्यापासून गमावली जाऊ शकतात. आधुनिक धर्मनिरपेक्षतेची संकल्पना भारतीय परंपरेच्या खोल अर्थाशी विसंगत आहे.”
समाजात चांगल्या गोष्टी उद्ध्वस्त केल्या जात असून वाईटाचे उदात्तीकरण होत आहे. त्यामुळे धर्माधिष्ठित लोकांना एकजूट करून वाईट प्रवृत्तीचा पराभव करणे गरजेचे आहे, असे डॉ. अभ्यंकर म्हणाले.
“संतांचं कार्य केवळ आध्यात्मिक उन्नती पर्यंत मर्यादित नव्हतं. त्यांनी सामाजिक समता, न्याय आणि मानवतेसाठी प्रयत्न केले. त्यांचे जीवन व कार्य समाजातील अनेक समानता विरुद्ध लढण्यासाठी एक प्रेरणा ठरले. त्यांनी पारंपरिक सामाजिक रुढी, जातीय भेदभाव, स्त्री भेदभाव, आणि इतर अन्यायपूर्ण परंपरांवर प्रहार केला, आणि तीच शिकवण घेऊन आपल्याला पुढे जायचा आहे.”
“आपण ज्या हिंदू संस्कृतीत जन्म घेतला, ती संस्कृती अत्यंत धन्य आहे. हिंदू धर्माचा मूलभूत तत्त्वज्ञान “वसुधैव कुटुंबकम्” म्हणजेच संपूर्ण पृथ्वी ही एक मोठी कुटुंब आहे. जे लोक आपले हृदय अकशासारखे विशाल ठेवून सर्व जगाला एक कुटुंब मानतात, तेच खरे हिंदू आहेत. हिंदू संस्कृती जगाला एक कुटुंब म्हणून पाहते, आणि याच दृष्टिकोनातून भारताला “देवघर” मानले जाते. आपल्या संतांनी संपूर्ण विश्वाला भारत रुपी देवघर प्रदान केले आहे, कारण त्यांनी जीवनाच्या उच्चतम मूल्यांचे वाचन आणि प्रसार केला, जे आजही आपल्याला प्रेरणा देतात,” असेही ते म्हणाले
.
समरसते विषयी बोलताना डॉ. अभ्यंकर म्हणाले की संतांचा समग्र दृष्टिकोन हा समाजात सर्वसमावेशकता, सहिष्णुता आणि एकोप्याचा होता. “ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत तुकाराम ह्या सारख्या विभूतींनी कधीही जाती, धर्म किंवा सामाजिक स्थितीच्या आधारावर भेदभाव केला नाही. त्यांना सर्व मानवता एकच कुटुंब म्हणून दिसत होती, आणि त्याचाच आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘हिंदवी स्वराज्याची’ स्थापना केली.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ सुरेश गोसावी म्हणाले, संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी शंकर अभ्यंकरांचे कार्य अत्यंत आवश्यक आहे. समाजात समरसता आणण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
भारतीय संस्कृती संगम संस्थेचे विश्वस्त गोविंद बेडेकर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.सुधीर पाचपोर यांनी पद्य सादर केले.श्रद्धा लोळे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर श्री ब्रह्मे यांनी आभार प्रदर्शन केले. निनाद केळकरांच्या सुश्राव्य पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.