20 व्या जागतिक मराठी संमेलनाचा उत्साहात समारोप
सातारा, ता. १२
“भारत हा मराठी भाषा बोलणाऱ्यांचा जगातील एक मोठा देश आहे. मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या देशांनी भारतात वसाहती केल्या मात्र आता भारताची मराठी भाषा जगाच्या वेगवेगळ्या देशात वसाहत करत आहे. मराठी भाषेचा प्रसार सर्वदूर होत असून मराठी भाषा जगाने शिकावी” असे प्रतिपादन विवेक सावंत यांनी केले. जागतिक मराठी अकादमी व रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विसाव्या जागतिक मराठी संमेलनाच्या समारोप समारंभात अध्यक्ष म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना विवेक सावंत म्हणाले, ” मराठी भाषा टिकवण्याची व समृद्ध करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मराठी भाषेतून दर्जेदार संवाद कसा करावा याचा एक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. जागतिक मराठी अकादमीने जर यात पुढाकार घेतला तर एमकेसीएल त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे तांत्रिक सहाय्य करेल. आपण सर्वजण मिळून आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न करूया. “
यावेळी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत दळवी म्हणाले, “तीन दिवस चाललेल्या या जागतिक मराठी संमेलनामुळे रयत शिक्षण संस्थेतील दहा हजारहून अधिक विद्यार्थ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. विविध प्रसार माध्यमे, यूट्युब यांच्या माध्यमातून हे संमेलन सातासमुद्रापलीकडे गेले आहे. सर्वच क्षेत्रांना व्यापणाऱ्या या संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल.” यावेळी चंद्रकांत दळवी यांनी हे संमेलन यशस्वी केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.
दरम्यान तीन दिवस चाललेल्या या संमेलनामध्ये सातारा शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांनीही मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेच्या शंभर वर्षातील हा सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावा असा क्षण असल्याचे नमूद केले.
माध्यमिक विभागाचे सहसचिव बी. एन. पवार यांनी आभार मानले. स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मीनाताई जगधने, रयत विद्यापीठाचे कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख, उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव शिवलिंग मेनकुदळे, ऑडिटर राजेंद्र मोरे, विद्याधर अनासकर, उदय दादा लाड, अशोक पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे, महेश म्हात्रे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.