मोदी माधव, तर मतदार केशव– महाराष्ट्रात व्होट जिहादचा दुसरा पार्ट
शिर्डी -विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलेले आहे. या निवडणुका कधी होणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. शिर्डी येथे भाजपचा राज्यस्तरीय मेळावा आज पार पडला. यावेळी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच देवेंद्र फडणवीस यांनी केले.
विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. या अनुषंगानेच आज शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशन बोलावल्याचे म्हटले जात आहे. या अधिवेशनात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधकांवार जोरदार हल्ला चढवला. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विधानसभेपेक्षाही मोठा विजय प्राप्त करायचा, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले.
स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका तीन-चार महिन्यात येतील, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सुप्रीम कोर्टाचा निकाल येणे बाकी आहे. तो निर्णय आल्यानंतर या निवडणुका होतील. विधानसभेत विजय मिळवला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुद्धा विजय मिळवायचा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र भाजपसाठी महत्वाचा आहे. ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत बुरी झाली, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता विरोधकांना टोला लगावला. कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे भाजपला विजय मिळाला असल्याचे म्हणत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाभारतातील गोष्ट सांगत नरेंद्र मोदी यांना माधव आणि मतदारांना केशव अशी उपमा दिली. या केशव आणि माधव यांच्यामुळे आपल्याला निवडणुकीच्या युद्धात विजय मिळाला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मला कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा भारताचे संविधान महत्वाचे आहे. कारण हेच संविधान सामान्यांची सेवा करण्यासाठी मला शक्ती देते, असे नरेंद्र मोदी म्हणतात. संविधानाचे यंदाचे अमृतमहोत्सवी वर्ष भारताची लोकशाही मजबूत करण्यासाठी, संविधान रुजवण्यासाठी वापरायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्तींचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात पाहायला मिळाला. भाजप आणि मोदींना पराभूत करता येत नाही, असे जेव्हा काँग्रेस, उबाठा, शरद पवारांची पार्टी यांना वाटले, तेव्हा त्यांनी अराजकातावादी सारख्या शक्तींना एकत्र घेऊन या देशात अराजकाता पसरवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. या महाराष्ट्रात व्होट जिहाद, फेक नरेटीव्ह बघितला. परंतु, गेल्या सहा महिन्यात राष्ट्रीय विचारांच्या संघटनांची एकत्र येऊन राष्ट्रवादाचे पुन्हा रोपण केले आणि अराजकतावादी ताकदींना विधानसभा निवडणुकीत पूर्णपणे पराभूत केले. त्यांना पराभूत केले, तरी त्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत, असा दावाही फडणवीस यांनी केला.
आपल्यासमोर बांगलादेशी घुसखोरांचे मोठे आव्हान आहे. देशात अलिकडच्या काळात बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. ते कागदपत्रे बनवून मतदार याद्यांमध्ये घुसत असल्याचा दावा केला. मालेगावमधून शेकडो नवीन जन्मप्रमाणपत्र लोकांना मिळाले. मालेगाव, अमरावतीतील अंजनगाव याठिकाणी अचानक 100 लोकांना जन्म प्रमाणपत्र मिळत आहे. 50-60 वर्षांचे लोक जन्मप्रमाणपत्र काढत आहेत. हा व्होट जिहादचा पार्ट सुरू झाला आहे, असा धक्कादायक दावा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. या घुसखोरांना बाहेर काढण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. एक हैं तो सेफ हैं हे पंतप्रधान नरेंद्र मोदींजींनी सांगितले आणि ते निवडणुकीत खरे ठरले, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.