शिर्डी- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय झाला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते त्याला 20 फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबतचे द्रोह केले होते, 2019 ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांची विचारधारा सोडली, अशा उद्धव ठाकरे यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली आहे. 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार आणून केले आहे, असे अमित शहा म्हणाले. काही निवडणूक या देशाच्या राजकारणाला बदलून टाकतात. विरोधकांचे महाराष्ट्रात येण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. पुन्हा एकदा परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना कानफडात मारत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी असल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिल्याचे अमित शहा म्हणाले.