शिर्डी- येथे भाजपचे राज्यस्तरीय महाअधिवेशन झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे नेते अमित शहा यांनी जोरदार भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शहा यांनी जय भवानी जय शिवाजीचा नारा दिला. आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अमित शहा यांनी अभिवादन केले.अमित शहा म्हणाले, आज महाराष्ट्रातील महाविजयानंतर आपण सगळे एकत्र आलो आहोत. तुम्हाला माहीत नाही की तुम्ही किती मोठे कार्य केले आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. आपले सोबतचे घटक पक्ष खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीला देखील मोठे यश मिळाले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते त्याला 20 फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे. उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबतचे द्रोह केले होते, 2019 ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांची विचारधारा सोडली, अशा उद्धव ठाकरे यांना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली आहे. 2024 पर्यंत महाराष्ट्र अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस सरकार आणून केले आहे.पुढे बोलताना अमित शहा म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर आपले विरोधक वाट बघत बसले होते की महाराष्ट्रात आता आपले सरकार येणार आहे. त्यांचे हे स्वप्न सुद्धा आपण सर्वांनी मिळून धुळीस मिळवले. मी जेव्हा आलो होतो साडे 9 हजार कार्यकर्त्यांशी मी संवाद साधला होता. काही निवडणूक असे असतात जे देशाच्या राजकारणाला बदलून टाकतात. महाराष्ट्र सरकारने हे करून दाखवले आहे. या सगळ्याचे शिल्पकार म्हणजे भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा प्रणाम.तुम्ही पुन्हा एकदा परिवारवादाचे राजकारण करणाऱ्यांना कानफडात मारत महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. काही जणांना उमेदवारी नाही मिळाली, पण सर्वांनी मिळून महायुतीला निवडून देण्याचा निश्चय केला होता. महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिले की एकनाथ शिंदे यांची शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि अजित पवार यांचीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मोदींच्या विकासाच्या राजकारणाला पाठिंबा दिला आहे.अमित शहा म्हणाले, आपल्या विजयाच्या मागे आपली एकजूट होती. 40 लाख सदस्य बनले आहेत अजून दीड करोड करायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो एकही बूथ असे नसावे की जिथे अडीचशे पेक्षा कमी सदस्य असतील असा पक्ष आपल्याला बनवायचा आहे. येणाऱ्या दीड महिन्यात असे जोमाने काम करा की प्रत्येक बूथवर 250 पेक्षा जास्त सदस्य जोडले जातील. सर्व महानगरपालिका, नगरपालिका स्थानिक संस्थांच्या निवडणुका येणार आहेत, यात विरोधकांना बसायला सुद्धा जागा मिळाली नाही पाहिजे याची काळजी तुम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. पंचायतमध्ये सुद्धा भाजप, तहसीलमध्ये सुद्धा भाजप, महानगरपालिकेतही भाजप, महाराष्ट्रातही भाजप आणि देशातही भाजप. पंचायत पासून पार्लियामेंटपर्यंत विजयाचे सूत्रधार बनण्यासाठी आज तुम्हाला बोलावले आहे. आभार मानायचे तर आहेत त्याच सोबत पुढील काम देखील सांगायचे आहे.